औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या सर्वेक्षणातून विविध व्याधी, आजारांनी ग्रस्त असलेल्या ९२ हजार ८७८ नागरिकांची माहिती समोर आली आहे. त्या नागरिकांवर प्रशासनाची प्राधान्याने नजर राहणार असून, त्या सर्वांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन, मनपा आणि आरोग्य यंत्रणेने केले आहे.
४२ हजार ८७३ नागरिकांना हायपरटेन्शन असल्याची माहिती समोर आली आहे. ३५ हजार २०३ नागरिक मधुमेह आजाराने ग्रस्त आहेत. ९५० लोक किडनीसंबंधित आजाराने, तर १ हजार ६२४ लोकांना यकृतासंबंधी आजार, ३६ लोकांना कर्करोग, तर स्थूलपणा व इतर आजार असलेल्या १३ हजार १९२ लोकांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’अंतर्गत केलेल्या पाहणीतून प्राप्त झाला आहे. आजवर जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४२ हजारांच्या पार गेली असली तरी यातील ४० हजार २४० रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सध्या ७१५ रुग्णांवर उपचार सुरू असून, जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९५.६२ टक्के आहे. कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्याच्या संख्येत घट होत असली तरी कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज झाल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात ९ लाख ८० हजार ६५ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ९२ हजार ८७८ नागरिकांना विविध प्रकारचे आजार असल्याचे लक्षात आले आहे. कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेदरम्यान आता या लोकांवर आरोग्य विभाग, तसेच प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.