औरंगाबाद : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) औरंगाबाद शाखेने महापालिकेला सहकार्य करावे, अशी विनंती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केली. आरोग्य विभागाला सहकार्य करण्याची तयारी आयएमएने दर्शवली.
मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या निर्देशानुसार गुरुवारी आयएमए हॉल येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, सचिव डॉ. यशवंत गाडे यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या या बैठकीत डॉ. मंडलेचा यांनी नमूद केले की, कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत आयएमए असोसिएशनसह शहरातील सर्व खासगी डॉक्टरांनी आरोग्य विभागाला मदत केली. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभागाने पूर्वतयारी सुरू केली आहे, यासाठी शहरात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याची गरज आहे. फिजिशियन असोसिएशन, भूलतज्ञ असोसिएशन, बाल रोग तज्ज्ञ असोसिएशन, आयसीयूमध्ये काम करणारे, जनरल प्रॅक्टिशनर आदींनी सहकार्य करावे.
असोसिएशनच्या डॉक्टरांनी मनपाच्या रुग्णालयांमध्ये मोफत सेवा देण्यास सहमती दर्शवली. यावेळी सत्यनारायण सोमानी, डॉ. अनुपम टाकळकर , डॉ. उज्ज्वला दहिफळे, डॉ. हरमीत सिंग बिंद्रा आदींची उपस्थिती होती.