हिंगोली : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांना सहा महिने उलटले तरीही अनेकांनी अद्याप निवडणूक खर्च दाखल केला नाही. त्यामुळे अशा ३८८ पैकी २९१ जणांना अनर्हतेची नोटीस देवून पुढील पाच वर्षांसाठी सदस्य राहण्यास किंवा निवडणूक लढविण्यास अपात्र का ठरविण्यात येवू नये, अशा नोटिसा बजावण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.ग्रामपंचायत निवडणुकीतील अनेक सदस्यांनी वेळेत खर्च दाखल केला नाही. निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्यापासून तीस दिवसांच्या आत हा खर्च दाखल करण्याचा निवडणूक आयोगाचा नियम आहे. मात्र तसे न करणाऱ्या ३८८ जणांना यापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर त्यापैकी ३ मयत, ७ जणांनी खर्च सादर केल्याचे तर ८७ जणांनी विलंबाने खर्च दाखल केल्याचे आढळून आले. त्यामुळे हे सदस्य वगळून उर्वरित २९१ जणांना नोटिसा बजावून खुलासा सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. या २९१ जणांचे पद गेल्यातच जमा आहे. मात्र त्यांना नोटिसीत पंधरा दिवसांची मुदत देवून पुढील पाच वर्षांसाठी सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यास निवडणूक लढविण्यासाठी अनर्ह का ठरविण्यात येवू नये, असा इशारा दिला. तर जिल्हाधिकारी कार्यालयात हा खुलासा समक्ष सादर न केल्यास आपले काहीही म्हणने नाही, असे समजून कार्यवाही करण्यात येईल, असेही नोटिसीत म्हटले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसीनंतर तरी ही मंडळी खुलासा सादर करेल की नाही, याची शंकाच आहे. अशा प्रकरणांत कदाचित संयुक्तिक खुलासा आल्यास जिल्हाधिकारी विचार करतील वा नाही, हे सांगणे अवघड आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने सदस्य अनर्ह झाल्यास पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ येणार आहे. निवडणूक खर्च सादर न केल्याने पुन्हा निवडणुकीवर लाखोंचा खर्च करावा लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
२९१ ग्रामपंचायत सदस्यांचे पद धोक्यात
By admin | Published: March 20, 2016 1:09 AM