२ महिन्यांनी प्रकृतीची विचारणा
लोकमत इफेक्ट : आरोग्य यंत्रणेला अखेर जाग
औरंगाबाद : पोस्ट कोविड रुग्णांकडे अखेर आरोग्य यंत्रणेने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन गेलेल्या एका रुग्णाला तब्बल २ महिन्यांनंतर कोविड सेंटरमधून फोनवरून प्रकृती कशी आहे, काही त्रास आहे का, अशी विचारणा करण्यात आली. असाच अनुभव इतर रुग्णांनाही येऊ लागला आहे.
कोरोनाचे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर पुढील ३ महिने खबरदारी घेणे गरजेचे आहे. घरी गेल्यानंतरही अनेक रुग्णांना त्रास उदभवण्याचा धोका असतो. परंतु रुग्ण घरी गेला की, जबाबदारी संपली, अशी अवस्था पहायला मिळते. पोस्ट कोविड रुग्ण वाऱ्यावर असल्याची परिस्थिती होती. हा प्रकार ‘लोकमत’ने २९ डिसेंबर रोजी ‘रुग्ण घरी गेला की जबाबदारी संपली’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. या वृत्तामुळे जागे झालेल्या आरोग्य यंत्रणेने रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस सुरु केली आहे.
सिडको बसस्थानक परिसरातील एका नागरिकास कोरोनामुळे सिपेट येथील कोविड केअर सेंटरमध्ये भरती व्हावे लागले. उपचार पूर्ण झाल्यानंतर २ ऑक्टोबर रोजी या रुग्णाला सुटी देण्यात आली होती. परंतु त्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीसंदर्भात कोणतीही विचारणा झाली नव्हती.
‘लाेकमत’चे मानले आभार
मंगळवारी या कोरोनामुक्त रुग्णाचा फोन वाजला आणि समोर मी कोविड सेंटरमधून डाॅक्टर बोलत आहे. तुमची प्रकृती कशी आहे, काही त्रास होतो का, असे विचारण्यात आले. काहीही त्रास नसल्याचे सदर कोरोनामुक्त रुग्णाने सांगितले. यानंतर या रुग्णाने ‘लोकमत’शी संपर्क साधून आभार मानले.