वाळूज महानगर : बजाजनगरच्या टपाल कार्यालयातील इलेक्ट्रिकल स्वीच जळाल्यामुळे तीन दिवसांपासून कामकाज ठप्प आहे. परिणामी टपाल कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात टपाल कार्यालय असून, या कार्यालयातून आधार कार्ड नोंदणी, स्पीड पोस्ट, टपाल योजनेतील विविध पॉलिसींचे हप्ते भरणे आदी कामकाज चालते. तीन दिवसांपूर्वी या टपाल कार्यालयातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे कार्यालयातील कामकाज ठप्प पडले आहे. वीज पुरवठा गायब झाल्याने संगणक बंद पडले असून, नवीन आधार कार्डाची नोंदणीही थांबली आहे. याचबरोबर स्पीड पोस्टचे बुकिंगही करता येत नसल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. औद्योगिक क्षेत्रामुळे या टपाल कार्यालयात कंपन्यांची महत्त्वाची पत्रे तसेच बिले ग्राहक तसेच संबंधितांना पोहोच करण्यासाठी स्पीड पोस्टचा वापर करतात. मात्र, विजेअभावी टपाल कार्यालयातील कामकाज बंद पडल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. टपाल कार्यालयातील सेवा केव्हा सुरळीत होणार, अशी विचारणा करणाऱ्या नागरिक व ग्राहकांना टपाल कार्यालयातील कर्मचारी उडवा-उडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करीत असल्याचा आरोप किरण दुधीवार, नरेंद्रसिंग यादव, समीर शेख, समाधान बडे आदींनी केला आहे.
याविषयी टपाल कार्यालयातील सहायक पोस्ट मास्तर सुनील काकड यांच्याशी संपर्क साधला असता, या टपाल कार्यालयातील इलेक्ट्रिक स्वीच जळाल्यामुळे कार्यालयातील दैनंदिन कामकाज बंद पडले आहे. दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच टपाल कार्यालयातील सेवा पूर्ववत होईल, असे त्यांनी सांगितले.
फोटो ओळ
बजाजनगरच्या टपाल कार्यालयातील इलेक्ट्रिक स्वीच जळाल्यामुळे कामकाज ठप्प पडले आहे.