औरंगाबाद : जि.प. शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना द्यावी, असे निर्देश देणारे परिपत्रक प्राप्त झाल्यानंतरही समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याच्या निर्णयावर जि.प. प्रशासन ठाम राहिले. मात्र, मंगळवारी सकाळी ११ वाजता आयोजित केलेली पदस्थापना देण्याची प्रक्रिया अचानकपणे स्थगित करण्याची नामुष्की जि.प. प्रशासनावर ओढवली.
ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकावरून जि. प. प्रशासन आणि शिक्षकांचा मोठा गोंधळ उडाला, या विषयाचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ प्रतिनिधीने शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांना ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकाबद्दल अवगत केले होते. जि.प. शिक्षकांची ३१ ऑगस्टपर्यंत रिक्त जागांची स्थिती ऑनलाइन बदली प्रणालीवर अपलोड करणे आणि जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना द्यावी, असे ग्रामविकास विभागाचे निर्देश आहेत, याकडेही त्यांचे लक्ष वेधले होते. मात्र, वरिष्ठ पातळीवर फोनद्वारे चर्चा केली असून मंगळवारी समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देणार आहोत, असे शिक्षणाधिकारी चव्हाण म्हणाल्या होत्या.
दरम्यान, पदस्थापना देण्याची घाई अंगलट येऊ शकते, हे मंगळवारी सकाळी लक्षात आल्यानंतर जि.प. प्रशासनाला ऐनवेळी पदस्थापना देण्याची प्रक्रिया स्थगित करावी लागली. ही प्रक्रिया कधी राबविणार, याबाबत शिक्षण विभागाने आता कानावर हात ठेवले आहेत.तथापि, २४ ऑगस्ट रोजी आंतरजिल्हा बदलीचे आदेश निर्गमित झाल्यानंतर ५ सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या जिल्ह्यातून १४९ पैकी अवघे ६३ शिक्षक शिक्षण विभागात रूजू झाले. मागील १५ दिवसांपासून हे शिक्षक पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असून ते शिक्षण विभागत चकरा मारत आहेत. मंगळवारी सकाळी ११ वाजता जि.प.च्या वेरूळ सभागृहात समुपदेशन पद्धतीने या शिक्षकांना पदस्थापना दिली जाणार होती.
काय आहे ग्रामविकास विभागाचे परिपत्रकसोमवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे निर्देश दिले की, जि. प. शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू करायची आहे. मात्र, ३१ ऑगस्टपर्यंत सेवानिवृत्त, निधन तसेच आंतरजिल्हा बदलीने गेलेल्या शिक्षकांमुळे रिक्त जागांचा तपशील ऑनलाइन बदली प्रणालीवर अपलोड करायचा आहे. जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना द्यावी.