लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या सुमारे ४० शिक्षकांमध्ये पदस्थापना मिळण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. सदरील शिक्षक हे पदस्थापनेसाठी रोज जिल्हा परिषदेत चकरा मारत असून, यामध्ये काही गरोदर माता व स्तनदा माता शिक्षिकांचाही समावेश आहे.यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, आंतरजिल्हा बदलीने दुसºया जिल्हा परिषदेतून आलेल्या शिक्षकांना सुरुवातीला १० आॅगस्ट रोजी समुपदेशन पद्धतीने पदस्थापना दिली होती. यामध्ये जवळपास १६ शिक्षिकांपैकी काही स्तनदा माता, तर काही गरोदर माता शिक्षिकांचा समावेश आहे. तथापि, गैरसोयीच्या शाळा गरोदर माता व स्तनदा माता शिक्षिकांच्या वाट्याला आल्यामुळे सदरील शिक्षिका पदस्थापना मिळालेल्या शाळांवर रुजू झाल्या नाहीत. त्यांनी सोयीची शाळा मिळावी म्हणून शिक्षण विभागाकडे विनंती केली. दरम्यानच्या काळात ग्रामविकास विभागानेही गरोदर माता व स्तनदा माता शिक्षिकांना सोयीच्या शाळा देण्याचे परिपत्रक जारी केले.दरम्यान, जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे या शिक्षिकांना कोणत्या ठिकाणी पदस्थापना द्यावी, हा पेच जिल्हा परिषदेसमोर निर्माण झाला होता. पोर्टलवर रिक्त जागा दिसत नसल्यामुळे शिक्षण विभागाने या शिक्षिकांना पदस्थापना दिली नव्हती. अशातच आंतरजिल्हा बदलीने आणखी १६ शिक्षक औरंगाबाद जिल्हा परिषदेत दाखल झाले, तर ६ शिक्षकांना पदस्थापना बदलून देण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेला दिले आहेत. अलीकडे जिल्हांतर्गत बदलीचा पेचही मिटला. या घटनेला पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला; पण अद्यापही रिक्त जागांचे पोर्टल खुले झाले नाही. त्यामुळे शिक्षण विभाग या शिक्षकांना पदस्थापना देऊ शकले नाही. आता गरोदर माता- स्तनदा माता शिक्षिकांना अगोदर पदस्थापना मिळणार की, अलीकडच्या काळात नव्याने आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना, असा प्रश्न निर्माण झाला असून या दोन्ही शिक्षकांमध्ये पदस्थापनेसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. परवा स्तनदा माता शिक्षिकांनी आपल्या तान्हुल्यांनाच सोबत घेऊन शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अध्यक्ष, शिक्षण सभापती आदींची कार्यालये गाठून पदस्थापना मिळण्याची विनंती केली.यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या १६ शिक्षक, गरोदर व स्तनदा माता असलेल्या १५ शिक्षक आणि विभागीय आयुक्तांनी पदस्थापना बदलून देण्याचे आदेश मिळविलेले ६ शिक्षक या सर्वांना पदस्थापना देण्यासाठी शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे फाइल सादर केली आहे. यांना सोमवारपर्यंत पदस्थापना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पदस्थापनेसाठी शिक्षकांत रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 11:46 PM