आर्या राऊत/ पूजा येवलाछत्रपती संभाजीनगर : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट पीजी’ची तारीख मार्चवरून थेट जुलै महिन्यात गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये निराशा असून, परीक्षार्थ्यांवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. परीक्षा का पुढे ढकलण्यात आली, याचे कारणही नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (एनबीई)ने दिलेले नाही. यामुळे परीक्षार्थी संभ्रमात आहेत.
डिसेंबरमध्ये जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ‘नीट पीजी २०२४’ परीक्षा ही ३ मार्च २०२४ रोजी होणार होती. मात्र, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची तारीख घोषित होण्याऐवजी परीक्षा थेट चार महिने पुढे म्हणजे जुलै महिन्याच्या ७ तारखेला होणार आहे. परीक्षेचा निकाल १५ ऑगस्टपर्यंत लागणार आहे. या विलंबामुळे २०२४च्या बॅचमधील शैक्षणिक प्रवेशाला उशीर होणार आहे. चार महिने परीक्षा उशिरा होणार असल्याने अभ्यासावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. ‘एनबीई’ने परीक्षा पुढे ढकलण्याचे कोणतेच कारण दिले नसल्याने यासंबंधी तक्रार तरी काय आणि कुणाकडे करावी, असे कोडे विद्यार्थ्यांसमोर आहे.
कारणच दिले नाही‘नीट पीजी २०२४’ परीक्षा पुढे ढकलण्यात आली, मात्र त्यासाठी कोणतेही सबळ कारण ‘एनबीई’ने दिले नाही. शिवाय ७ जुलै ही तात्पुरती तारीख असल्याचे नमूद केले आहे. यामुळे ७ जुलैला तरी ही परीक्षा होणार का, याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहे. ३ मार्चच्या दृष्टीने तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा परीक्षा पुढे गेल्याने मानसिक तणाव वाढला आहे. परीक्षेपर्यंतचे सर्व आर्थिक नियोजन, अभ्यासाचे नियोजन विद्यार्थ्यांनी केले होते. ‘एनबीई’च्या एकांगी निर्णयामुळे परीक्षार्थ्यांवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले. या धोरणाबद्दल विद्यार्थ्यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला.
परीक्षेबद्दल शंकाचपरीक्षा पुढे ढकलल्याने बरेच विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. सुरुवातीला जी अभ्यास करण्याची गती होती, त्या गतीने आता अभ्यास होत नाही. परीक्षा पुढे का ढकलण्यात आली याचे कारण सांगितले नाही. ७ जुलैला तरी परीक्षा होईल की नाही, याची खात्री नाही.-मृण्मयी गणवीर, परीक्षार्थी.
मुलांचा विचार हवावसतिगृह, मेस आणि अभ्यासिका याचे आर्थिक नियोजन ठरवून आम्ही घरून छत्रपती संभाजीनगरात अभ्यासासाठी थांबलो होतो; पण ठरवलेल्या नियोजनानुसार आता जास्त खर्च लागतोय आणि त्यामुळे घरी पैसे मागावे लागतात. असे निर्णय घेण्याआधी मुलांचा विचार केला पाहिजे.-प्रतीक्षा जाधव, परीक्षार्थी
फारसा फरक पडणार नाहीपरीक्षा पुढे ढकलल्याने प्रवेश प्रक्रियेत कुठलीही अडचण येणार नाही. कारण, कोविडनंतर ही प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात होत आहे. मार्चमध्ये परीक्षा होऊन देखील निकाल ऑगस्टमध्येच लागणार होता आणि जुलैमध्ये घेऊन देखील ऑगस्टमध्येच निकाल आणि पुढील प्रवेश प्रक्रिया ही त्याच काळात होईल. खूप फरक पडणार नाही.-लक्ष्मण पालकर, परीक्षार्थी
आता खर्च वाढेलमी मूळ मोहोळचा. परीक्षेच्या तयारीसाठी मुले खासकरून अभ्यासाचे वातावरण असल्याने छत्रपती संभाजीनगर हे शहर निवडतात. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे आता आर्थिक नियोजन करणे अवघड होणार आहे. मला घरभाडे, मेस असा महिन्याचा खर्च ८ ते १० हजार रुपये इतका येतो. आता हा खर्च वाढेल.-आकाश कोळेकर, परीक्षार्थी.