गंगापूर : वैजापूर, गंगापूर व कोपरगाव या तालुक्यांसाठी ५ एप्रिल रोजी नांदूर मधमेश्वर जलगती कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. गंगापूर तालुक्यातील अनेक पोटचाऱ्यांमध्ये झाडे, झुडपे, पाला व पाचोळा साचल्याने पायथ्याचे लाभधारक उन्हाळी आवर्तनाला मुकणार आहेत.
सध्या उन्हाळी पिकांमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली असून उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नामकाचे आवर्तन सोडण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होती. या मागणीनुसार ५ एप्रिलपासून पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. नामकाच्या पाण्यामुळे तिन्ही तालुक्यातील २० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येते. या पाण्याचा वैजापूर तालुक्यातील ४९, तर गंगापूर तालुक्यातील ४६ गावांना फायदा होतो. पायथा ते माथा या नियमानुसार हे पाणी वाटप होणार असले तरी, गंगापूर तालुक्यातील अनेक वितरिका व पोटचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. काटेरी झुडपे वाढल्याने पायथ्याकडे जाणाऱ्या पाण्याचा कमी होणारा वेग व उन्हाच्या तीव्रतेने लाभक्षेत्रातील पायथ्याला असणाऱ्या गावांना पाणी पोहोचण्यास अडचण येणार आहे. यामुळे उन्हाळी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. आवर्तनापूर्वी पोटचाऱ्यांची दुरुस्ती होणे क्रमप्राप्त असताना याकडे दुर्लक्ष केल्याने ऐन उन्हाळ्यात अनेक गावांतील शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्याला मुकावे लागणार आहे. याविषयी नामकाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखवत उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच अधिक माहिती घेतली असता, फक्त कागदावरच चाऱ्या दुरुस्तीचे काम झाल्याचे बोलले जात आहे. वस्तुस्थिती काहीही असली तरी, नामका अधिकाऱ्यांच्या चालढकलपणामुळे शेतकऱ्यांना मात्र हक्काच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
फोटो :
कालव्याच्या पोटचाऱ्यामध्ये वाढलेली झाडे, झुडपे.
020421\20210402_115524_1.jpg
गंगापूर तालुक्यात कालव्याच्या पोटचाऱ्यामध्ये वाढलेली झाडे, झुडुपे.