औरंगाबाद : पुढच्या महिन्यात म्हणजेच २ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी शहरातील खड्डे बुजविण्याचे मोठे आव्हान मनपासमोर आहे. मागील वर्षी मनपाने खड्डे बुजविण्यासाठी नऊ निविदा काढल्या होत्या. साडेचार कोटी रुपयांच्या निविदांकडे एकाही कंत्राटदाराने लक्ष दिले नाही. आता खड्डे बुजवायचे तरी कसे, असा प्रश्न मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना पडला आहे.
शहरात अद्याप एकही मोठा धोऽऽधो पाऊस झालेला नाही. मागील दीड महिन्यापासून रिमझिम सरी कोसळत ओहत. एवढ्याशा पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. खड्ड्यांमध्ये पावसाचे थोडेही पाणी साचले की खड्डा वाहनधारकाला दिसत नाही. त्यामुळे दररोज लहान मोठे अपघात होत आहेत. मनपा प्रशासन आणि सत्ताधारी मागील वर्षभरापासून १०० कोटींतील ३० रस्त्यांकडे लक्ष लावून बसले आहेत. त्यामुळे दुसऱ्या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले. दरवर्षी गौरी, गणपतीपूर्वी पॅचवर्क करण्यात येत असे. मागील वर्षी निधी नसल्याचे कारण दाखवून मुरुमाने खड्डे भरण्यात आले होते. दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्तांना पत्र देऊन तात्पुरत्या स्वरुपात रस्त्यांवरील खड्डे बुजविणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. तसेच मुरूम आणि खडी टाकून बुजविण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र पथक कार्यान्वित करावे. या पथकात एक रोलर, एक टेम्पो आणि काही कर्मचाऱ्यांचा समावेश असावा, असेही पत्रात नमूद केले आहे.
पॅचवर्कसाठी विनंती करणारपावसामुळे जागोजागी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पॅचवर्कच्या कामाच्या प्रभागनिहाय ४५ ते ५० लाखांच्या निविदा मागविल्या होत्या. मात्र, पालिकेकडून वेळेवर बिले मिळत नसल्याने कंत्राटदारांनी या कामांकडे पाठ फिरविली आहे. एकाही कंत्राटदाराने निविदा भरलेली नाही. शंभर कोटी रुपयांची रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडून पॅचवर्क करून घेतले जाईल, असे महापौरांनी सांगितले.
मनपानेच केले पथक विसर्जितकाही वर्षांपूर्वी रस्त्यांच्या पॅचवर्कसाठी पालिकेकडे स्वतंत्र पथक होते. या पथकात रोड रोलर, काही कर्मचारी, दोन टेम्पो यांचा समावेश होता. हे पथक बाराही महिने खड्डे बुजविण्याचे काम करायचे. परिणामी, खड्डा पडला की तो वेळीच बुजविला जायचा. कालांतराने प्रशासनाने हे पथक विसर्जित केले. साडेतीन वर्षांपूर्वी तत्कालीन प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हे पथक पुन्हा स्थापन करण्याचा प्रस्ताव सभेकडून मंजूर करून घेतला होता. तो आजपर्यंत कागदावरच आहे. याशिवाय मनपाने स्वत:चा डांबर प्लँट उभा करावा, असा आग्रह त्यांनी धरला होता. आयुक्तांच्या या कल्पनेला खो देण्यात डांबर लॉबी आघाडीवर होती.