वाळूज महानगर : ए.एस.क्लबपासून पैठणला जोडणाऱ्या लिंकरोडवर ठिकठिकाणी जिवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे ये-जा करणाºया वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, अपघाताचा धोका बळावला आहे.
दशकभरापूर्वी रस्ते विकास महामंडळाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करुन वाळूज उद्योगनगरी, औरंगाबाद शहर तसेच पैठणला जोडणाºया लिंकरोडचे काम करण्यात आले. ए.एस.क्लब ते पैठणरोडला जोडणाºया या अवघ्या चार ते पाच किलोमीटर रस्त्याची आजघडीला अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने यात रात्रीच्यावेळी वाहने आदळून अपघात घडत आहेत. मुख्य म्हणजे साऊथसिटी परिसरातील वळण रस्त्यावर तसेच पुलालगत रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले होते. आता पुन्हा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना ये-जा करताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
संबंधित विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी आर.के.सिंह, युसुफ पठाण, सुरजितसिंह, करनाल जडेजा, खुशबुसिंह, सुरजकुमार वर्मा आदींनी केली आहे.