संक्रांत सणाला महिला जसे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून वाण लुटतात, तसेच कुंभाराचा आवा लुटण्याचीही मोठी परंपरा आहे. कुंभाराचा आवा म्हणजे मातीच्या वस्तू भाजण्याची भट्टी. विटांचे थर आणि त्यावर कोळसा, पुन्हा विटांचे थर आणि वर कोळसा अशी आव्याची रचना असते. ज्या महिलेला संक्रांतीला कुंभाराचा आवा लुटायचा असतो, ती तिच्यासाेबत कमीत कमी २० ते २५ सुवासिनींना घेऊन कुंभाराच्या घरी जाते. तेथे कुंभाराच्या आव्याची विधिवत पूजा केली जाते आणि नंतर रांजण, कुंड्या, माठ, बोळकी, पणत्या, सुरई, मडके, घट, चूल, झाकणी अशा आव्यात तयार झालेल्या सगळ्या वस्तूंची पूजा करून त्या जमलेल्या सगळ्या महिलांमध्ये वाटून दिल्या जातात. यासाठी एका महिलेला कमीत कमी ५ हजार एवढा खर्च लागतो.
दरवर्षी संक्रांतीच्या दिवशी १५ ते २० ग्रुप येत असतात. त्यामुळे संक्रांतीच्या जवळपास एक महिना आधीच कुंभार बांधव तयारीला लागतात आणि सर्व वस्तू तयार करून ठेवतात. पण यंदा मात्र त्यांच्या सगळ्याच आशा-अपेक्षांवर पाणी फिरले. एकही ग्रुप आवा लुटण्यासाठी आला नाही, असे बेगमपुरा परिसरातील व्यावसायिक सविता जोबले यांनी सांगितले.
चौकट :
अशी ही पहिलीच संक्रांत
पिढ्यान् पिढ्या आम्ही हा व्यवसाय करत आहोत. पण कुंभाराचा आवा पूजायला एकही महिला आली नाही, ही माझ्या आठवणीतील पहिलीच संक्रांत आहे. दरवर्षी कमीत कमी १० ग्रुप तरी येतातच. एका ग्रुपमध्ये बऱ्याचदा ५० पेक्षाही अधिक महिला असतात. पण यंदा मात्र सगळेच हुकले. दुपारी ३ वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली. पण कुणीही न आल्याने नंतर आशा सोडून दिली. कुंभाराचा आवा हा जरा महागडा वाणप्रकार आहे. कोरोनामुळे बहुुतेकांचेच आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचाच आम्हाला फटका बसला असे वाटते.
- सविता जोबले