लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ४० टक्के पथदिवे बंद ठेवून मेन्टेनन्सपोटी तब्बल १५ कोटी रुपयांची बिले उचलण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या घोटाळ्याप्रकरणी मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करून बिलांची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाने आजपर्यंत यासंदर्भात कोणतीच कारवाई सुरू केली नाही. राजकीय दबावापोटी मनपा प्रशासनानेही नांगी टाकल्याचे दिसून येत आहे.शहरात ५० हजारपेक्षा अधिक पथदिवे आहेत. या पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने २२ कंत्राटदार नेमले आहेत. दर महिन्याला एका कंत्राटदाराला किमान २५ लाख रुपयांची खिरापत वाटण्यात येते. कोणतेही काम न करता मागील सहा महिन्यांमध्ये कंत्राटदारांनी १५ कोटी रुपये मनपाकडून घेतल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने विद्युत ठेकेदारांना काम न करता दिली १५ कोटींची बिले या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी जाहीर केले होते की, ज्या भागातील पथदिवे बंद राहतील त्या भागातील संबंधित कंत्राटदाराला दंड लावण्यात येईल. त्याचप्रमाणे १५ कोटी रुपये या कंत्राटदारांनी कशा पद्धतीने लाटले याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही नमूद केले होते. १० जुलैपासून आयुक्त चीन दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावर जाण्यापूर्वी आयुक्तांनी एकाही कंत्राटदाराला दंड लावला नाही. काम न करता बिले उचलणाऱ्या कंत्राटदारांची चौकशीही सुरू केली नाही. भ्रष्टाचाराचे ‘दिवे’लावणाऱ्या कंत्राटदारांना प्रशासनच अभय देत असल्याचे समोर येत आहे.
विद्युत ठेकेदारांना मनपाचे अभय!
By admin | Published: July 16, 2017 12:24 AM