लोकमत न्यूज नेटवर्कउमरगा : नगर पालिकेची शनिवारी होणारी सर्वसाधारण सभा रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी विरोधी बाकावरील सेना-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. असे असतानाच दुसरीकडे सत्ताधारीही सभा घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे सध्या पालिकेत सत्ताधारी अन् विरोधकही आक्रमक झाल्याचे चित्र आहे.सध्या उमरगा पालिकेत काँग्रेस-भाजपा सत्ताधारी आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत. पालिकेत सत्ता स्थापन झाल्यावर सत्ताधारी काँग्रेस-भाजपने विरोधी पक्षांच्या नगरसेवकांच्या वॉर्डात विकास कामांचा शुभारंभ करत विरोधकांना सोबत घेवून विकास करण्याचे धोरण राबविल्याचे दिसून आले होते; परंतु अवघ्या तीनच महिन्यात विरोधी शिवसेना व राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक होत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे. मागील महिन्यात पालिकेने निविदा प्रसिद्ध केली होती. परंतु, विरोधी नगरसेवकांनी निविदा प्रसिद्ध केलेली कामे यापूर्वीच झाली असून, काम झाल्यानंतर निविदा प्रसिद्ध झाली म्हणून नगर पालिकेसमोर २० एप्रिल रोजी उपोषण केले होते. तर झालेली कामे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी परस्पर करून घेतल्याचा पलटवार काँग्रेसने काँग्रेसने केला होता. त्यानंतर शहराच्या हद्दवाढी विरोधात शिवसेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगर पालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन केले. तर आता शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत पूर्ण झालेली अनेक कामे मंजुरीसाठी ठेवून लाखो रूपयांची बोगस बिले उचलण्याचा डाव असल्याचा आरोप पालिकेतल सेनेचे गटनेते संतोष सगर व राष्ट्रवादीचे गटनेते संजय पवार यांनी प्रसिद्धीपत्रक काढून केला. तर विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला आहे.
पालिकेत विरोधकांसह सत्ताधारीही आक्रमक !
By admin | Published: May 20, 2017 12:44 AM