लाडसावंगी : वीजबिलवाटप नाही, पूर्वसूचना नाही आणि अचानक शेतीचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ऐन पिकाला पाणी देण्याची वेळ असताना वीज नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतकरी दररोजच्या वेळा पत्रकानुसार वीजपंप सुरू करण्यासाठी शेतावर गेले असता, वीज न आल्याने त्यांनी लाडसावंगी वीज केंद्राशी संपर्क साधला असता, वीजबिले भरण्यासाठी शेतीचा वीजपुरवठा खंडित केल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना याबाबत कुठलीही सूचना दिली नाही, तसेच बिले किती आहेत, केव्हा भरायची, याबाबतही महावितरणने कल्पना न दिल्याने शेतकरी भांबावले आहेत. त्यातच उन्हाळ्याची चाहूल लागल्याने रब्बीच्या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. नाहीतर पिके वाया जाण्याची शक्यता आहे. त्यात आता रोहित्रावरूनच वीज बंद करण्यात आली आहे. विजेची गरज असेल, तर लाडसावंगी वीज उपकेंद्रात येऊन बिले घ्या व भरणा करा, तरच वीजपुरवठा सुरळीत होईल, असा पवित्रा महावितरणने घेतला आहे.
चौकट
अडचणीत अडचणी वाढल्या
शेतकऱ्यांना आता पिकांना पाणी देणे अत्यंत गरजेचे असताना, महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. शेतकऱ्यांनी वीजबिल भरावे, असा यामागील तर्क आहे. मात्र, एका रोहित्रावर २० ते ३० शेतकरी वीज ग्राहक असतात, त्यात एकाने बिल भरले, तरी वीजपुरवठा सुरू केला जात नाही. शिवाय ज्यांच्या विहिरीत पाणीच शिल्लक नाही, असे शेतकरी वीजबिल भरत नाहीत. यामुळे अडचणीत अडचणी निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चौकट
आधी बिले वाटण्याची मागणी
लाडसावंगी वीज उपकेंद्रात जवळपास बावीस गावे असून, शेतकरी ग्राहक संख्या मोठी आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने उपकेंद्रात येऊन बिले घेणे, मग भरणे यात वेळ जास्त जाणार असल्याने, रब्बी पिके हातची जाण्याचा धोका आहे. यामुळे आधी बिलांचे वाटप करून, मग बिले भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, अन्यथा वीज केंद्रावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोट
शेतपंपांची वीजबिले भरण्यासाठी कंपनीने कठोर पावले उचलली आहेत. बिले वसुलीसाठी वरिष्ठांचे आदेश असल्यामुळे आम्ही काही भागांतील शेतीचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
- एस. एस. सोनुने,
कनिष्ठ अभियंता, लाडसावंगी वीज उपकेंद्र.