वाळूज महानगर : डीपीची दुरुस्ती करण्यास महावितरण टाळाटाळ करीत असल्यामुळे तीसगाव परिसर १५ दिवसांपासून अंधारात आहे. त्यामुळे संतप्त ग्राहकांनी शनिवारी (दि.२०) महावितरणच्या सिडको कार्यालयात धडक देत कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
तीसगावच्या रमाईनगर व साठेनगराला वीज पुरवठा करणारी डीपी १५ दिवसांपूर्वी जळाली होती. ग्राहकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यानंतर डीपी दुरुस्तीसाठी नेण्यात आली. मात्र, पंधरवाडा उलटूनही डीपीची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे शेकडो ग्राहक त्रस्त झाले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना बजाजनगर व सिडकोत दळण दळण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. विजेअभावी घरातील विद्युत उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत. थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी डीपीची दुरुस्ती करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. अनेक ग्राहकांनी थकीत वीज बिले भरूनही डीपीची दुरुस्ती होत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार रमेश दाभाडे, किशोर नितनवरे, किसन म्हस्के, अनिल सपकाळ, रावसाहेब खरात, गंगूबाई जाधव, सुखदेव जाधव, बाबासाहेब रायकर, साहेबराव खरात, राजू जंगले, मनोज राजपूत, आशाबाई शिरोडे, सुंदरबाई जाधव, नंदा मोगल, आशाबाई मासोळे आदींनी केली.
महावितरणचे अभियंता प्रशांत तोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, डीपी बसविण्यात आली असून तांत्रिक अडचणींमुळे रविवारी सांयकाळनंतर वीज पुरवठा सुरू केला जाईल.
फोटो ओळ- तीसगाव परिसरातील विद्युत डीपीची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी त्रस्त ग्राहकांनी महावितरणच्या सिडको कार्यालयात धडकून कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
---------------