फुलंब्री : फुलंब्री ते खुलताबाद हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गाच्या मध्यभागी विद्युत खांब रोवले आहेत. या खांबामुळे अपघाताचे प्रमाण मात्र, वाढलेले आहे. हे विद्युत खांब काढून घेण्यात यावे, अशी मागणी वाहनाधारक करीत आहेत.
फुलंब्रीपासून खुलताबादला जाणारा मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ आहे. या मार्गाचे रुंदीकरण तसेच सिमेंटीकारण करण्याचे काम सध्या सुरू आहे. फुलंब्री शहरापासून खुलताबादकडे किमान दीड कि.मी. अंतरापर्यंत महामार्गाच्या मध्यभागी विद्युत खांब लावण्यात आलेले आहे. मात्र, ते खांब अत्यंत धोकादायक बनले आहेत. ६० फुटांच्या रुंद रस्त्यावर मध्यभागी खांब लावले आहेत. परिणामी, रस्ता अरुंद झाला आहे. रात्रीच्या प्रसंगी हे खांब दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. लवकर हे खांब हटविले गेले नाही तर येत्या काळात आंदोलन करण्यात येईल, असे उद्योजक कैलास राऊत यांनी सांगितले.
--------------
अपघाताचे सत्र सुरूच
फुलंब्री -खुलताबाद मार्गावर दीड कि.मी. अंतरापर्यंत लावलेले खांब वाहतुकीकरिता अडथळा ठरत आहेत. या खांबाला सहावेळा दुचाकी धडकल्या आहेत. तर पाचवेळा चारचाकी वाहनांची धडक झाली. यात एकाचा जीवही गेला आहे. तर अनेक जण जायबंदी झालेले आहेत. तसेच सध्या अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
------
खुलताबाद मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी लावलेले विद्युत खांब हे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निर्देशानुसार लावण्यात आलेले आहेत. या खांबामुळे अपघात घडत आहेत. यासंदर्भात अनेक तक्रारी आलेल्या आहेत. आम्ही संबंधित विभागाला कळविले, पण त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती गंगामाई कंपनीचे प्रोजेक्ट मेनेजर डी. पी. भांबर्डे यांनी दिली .
-------------
फोटो कॅप्शन
फुलंब्री -खुलताबाद महामार्गाच्या मध्यभागी लावण्यात आलेले विद्युत खांब.