भोकरदन : तालुक्यातील १९५ पाणीपुरवठा योजनेकडे महावितरण कंपनीचे ३ कोटी ७० लाख वीजबिल थकल्यामुळे ७० टक्के योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ३१ मार्चपर्यंत बिल न भरणाऱ्या योजनेचा सुध्दा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरण कंपनीच्या वतीने देण्यात आला आहे़ तालुक्यात एकूण १५ कोटींची थकबाकी़भोकरदन तालुक्यात महावितरण कंपनीची ग्राहकांकडे सुमारे १५ कोटी रूपयांची थकबाकी झाली आहे. शासनाने वीजबिल वसुलीसाठी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. महावितरण कंपनीच्या वतीने सध्या वीजबिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील घरगुती, औद्योगिक व वाणिज्य ग्राहकांकडे ३ कोटी रूपयांची थकबाकी आहे. तालुक्यातील १९५ पाणीपुरवठा योजनेकडे ३ कोटी ७० लाख रूपये, कृषी पंपधारक ग्राहकाकडे ८ कोटी ७२ लाख रूपये थकबाकी आहे. तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे कृषी पंप धारकांकडे बिल थकीत होण्याचे प्रमाण वाढले आहे तर पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे वीजबिल भरण्यासाठी ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन नाही. उपकार्यकारी अभियंता विनोद ओव्हळ म्हणाले की, वीजबिल वसुलीसाठी शासनाने कठोर निर्णय घेतला आहे. तालुक्यात १५ कोटींच्या जवळपास थकबाकी आहे. गेल्या महिन्यामध्ये महावितरणनने १ कोटी ३० लाखांची वसुली केली. त्याच प्रमाणे पाणी पुरवठा योजनांकडे ३ कोटी ७० लाख रूपये थकबाकी आहे. ती वसुलीसाठी सरपंच व ग्रामसेवकाकडे वेळोवेळी मागणी केली. तरीही भरणा करण्यात आलेला नाही. (वार्ताहर)
८० टक्के योजनांचा वीजपुरवठा खंडित
By admin | Published: March 28, 2017 12:02 AM