छत्रपती संभाजीनगर : उद्धवसेनेसाठी बालेकिल्ला अशी ओळख असलेला औरंगाबाद ‘मध्य’ मतदारसंघ परत एकदा आपल्याकडे खेचून आणणे शिंदेसेनेचे आ. प्रदीप जैस्वाल यांच्यासाठी अशक्यप्राय होते. यंदाच्या निवडणुकीत दिग्गज राजकीय तज्ज्ञांनी बालेकिल्ल्याचा बुरूज ढासळला, उद्धवसेना मुसंडी मारणार, २०१४ सारखी राजकीय ट्रँगल निर्माण होईल, असा कयास लावला होता. या राजकीय तज्ज्ञांचे तर्कवितर्क खोटे ठरवत जैस्वाल यांनी ‘मध्य’वर भगवा फडकावला. ही किमया करताना अगोदर त्यांनी एमआयएम, उद्धवसेनेच्या उमेदवारांचे गड असलेले भाग भेदले. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.
जैस्वाल यांनी मतदारसंघातील गुंठेवारी वसाहतींमध्ये विविध विकासकामे केली. शासनाकडून प्राप्त निधीतून सिमेंट रस्ते, ड्रेनेज लाइन या दोन मूलभूत सोयी-सुविधा दिल्या. ही कामे करताना त्यांनी आपले मतदान पक्के केले. ज्या भागात ड्रेनेज लाइनचे जाळे नाही, त्या भागात ३५० कोटींच्या ड्रेनेजचा प्रकल्प मंजूर केला. याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यापारी, उद्योजक, नोकरदार, विविध संघटनांचा पाठिंबा मिळविला. निवडणुकीत त्यांच्या प्रचाराची धुरा दोन्ही मुलांनी यशस्वीपणे सांभाळली.
बाळासाहेब थोरात यांचा गड भेदलाउद्धवसेनेचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांचे सर्वाधिक वर्चस्व असलेल्या मयूर पार्क, भगतसिंगनगर, सुरेवाडी, टीव्ही सेंटर, जटवाडा रोड, हडको कॉर्नर, एन-११ आदी भागांत जैस्वाल यांनी मतदानाला सुरुंग लावला. मयूर पार्क येथील दादोजी शाळेच्या मतदान केंद्रावर ५०७ मतांपैकी जैस्वाल यांना ३२० तर थोरात यांना १४७ मते मिळाली. या भागातील प्रत्येक मतदान केंद्रावर जैस्वाल - थोरात यांना कमी-अधिक मते प्रत्येक राउंडमध्ये पडत होती. ही किमया थोरात यांना जुन्या शहरात करता आली नाही. पहिल्या फेरीपासून थोरात यांना मतांसाठी चाचपडावे लागत होते.
मुस्लिम बहुल भागातून मतदानमुस्लिम बहुल भागातही जैस्वाल यांनी आपला करिष्मा दाखविला. मौलाना आझाद महाविद्यालयाच्या एका बूथवर जैस्वाल यांना १०२, थोरात यांना ११५ तर नासेर सिद्दीकी यांना ३४२ मते मिळाली. मिसरवाडी-पिसादेवी भागातील मिलेनियम इंग्रजी शाळेच्या बूथवर जैस्वाल यांना ३१३ तर सिद्दीकी यांना २९१ मते मिळाली. मौलाना आझाद हायस्कूल टाऊन हॉल येथे जैस्वाल यांना ३७, थोरात ७३, जावेद कुरैशी ७५, सिद्दीकी यांना ३५३ मते मिळाली. प्रत्येक मतदान केंद्रावर काही प्रमाणात का होईना जैस्वाल यांनी मते घेतली.