छत्रपती संभाजीनगर - उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. त्यातूनच जरांगे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवावी अशी चर्चाही होत असून भाजपा नेते आशिष देशमुख यांनी तर, ते महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार असल्याचा दावाच केला होता. आता, आपल्या राजकीय चर्चेबाबत आणि भूमिकेबाबत जरांगे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. तसेच प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन आणि आनंद आंबेडकरांच्या भेटीवरही त्यांनी मौन सोडले.
उद्या मी रुग्णालयातून डिस्चार्ज घेत आहे. त्यानंतर, २ दिवस जवळच्या लग्नकार्यासाठी गावाकडं जात आहे, असे जरांगे यांनी सांगितले. तसेच, आनंद आंबेडकर यांच्या भेटीवर भाष्य करताना, प्रकाश आंबेडकर यांचा शब्द डावलणं मला थोडं जड जातं. पण, माझं त्यांना आदरपूर्वक म्हणणं आहे. माझा सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळे, सगळा फोकस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळावं, याकडे आहे. माझा राजकीय मार्ग नाही, माझा सामाजिक मार्ग आहे. मी हा लढा समाजासाठी उभा केलेला आहे, असे म्हणत राजकीय भूमिका घेणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.
जालना मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवणार, अशी चर्चा आहे. मराठा समाजही तुम्ही निवडणूक लढवावी, अशी भूमिका घेत आहे, त्यासंदर्भाने प्रश्न विचारला असता. जर तरला उपयोग नाही, समाज माझा मालक आहे. पण, राजकारण हा माझा मार्ग नाही, ज्वलंत मुद्दा माझ्यासमोर सध्या फक्त आरक्षणचा आहे. समाजाचा प्रश्न हाच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाच आहे. गोरगरीब मराठ्यांचे पोरं, कष्टकऱ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत, असे म्हणत राजकीय भूमिका घेणार नसल्याचंही जरांगे यांनी स्पष्ट केले.
तर कोट्यवधी लोक रस्त्यावर दिसतील
मला अटक करू द्या, ज्या जेलमध्ये असेन, ज्या रस्त्याने जाईल तेव्हा कोट्यवधी लोक रस्त्यावर दिसतील. मी दोषी नाही. मी समाजासाठी लढतोय. उभं आयुष्य पणाला लावलंय. ५७ लाख नोंदींच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना आरक्षण मिळालं असेल. उर्वरित मराठा समाजासाठी आरक्षण मागतोय. कुठलीही यंत्रणा वापरा, काहीही झालं तरी मी हटत नाही. सत्ता असल्याने ते कधीही अटक करू शकतात. आम्हाला कायदे कळत नाही का...संचारबंदी कधी लावावी लागते हे कळते. रात्रीच्या कारवाया सुरू आहेत असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.