सोयगाव (जि. औरंगाबाद): बिबट्याने शिकार करण्यासाठी चक्क वानरांच्या टोळीचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला, परंतु बिबट्याच्या पाठलागामुळे धावत दमलेल्या वानरांच्या टोळीने जीव वाचविण्यासाठी उंच झाड गाठले खरे, परंतु अखेरीस पळून पळून दमलेल्या या टोळीतील सहा वानरांनी बिबट्याच्या दहशतीने झाडावरच जीव सोडला. ही थरारक घटना शुक्रवारी तालुक्यातील कंकराळा शिवारात उघडकीस आली. दरम्यान, वानरांनी सुरक्षेच्या दृष्टीने गाठलेल्या झाडाखाली बिबट्या तासभर गांगरल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. रात्री उशिरापर्यंत वन विभागाने या घटनेचा पंचनामा केलेला नव्हता.
कंकराळा शेती शिवारात सायंकाळी शेतातून घराकडे परत येत असताना शेतकरी ज्ञानेश्वर (नाना) पाटील यांना शेताच्या बांधावरून बिबट्या व वानरांचे पाठशिवणीचे थरारक दृश्य दिसले. एकटे असल्याने पाटील यांना बिबट्याला हुसकावून लावण्याची हिंमत झाली नाही. त्यांनी उभ्या पिकांत लपून हे थरारक दृश्य पाहिले. बिबट्याच्या तावडीत न सापडण्याचा निर्णय घेतलेल्या वानरांच्या टोळीने जीव मुठीत धरुन सैरावैरा पळ काढला व हुशारीने गट क्र. ७२ मधील उंच झाड गाठले. त्या झाडावर सर्व वानरांनी आश्रय घेतला, पण या टोळीतील सहा वानरांनी दमल्याने जीव सोडला.
वानरांची शिकार करायचीच, असा निर्धार केलेल्या बिबट्याने तरीही त्यांचा नाद सोडला नाही. जवळपास तासभर बिबट्या या झाडाखाली वानरांची वाट पाहात थांबला. परंतु, यातील दोन वानरांचा मृतदेह झाडावरुन खाली पडला. बिबट्याने शिकार साधली व या मृत वानरांच्या नरडीचा घोट घेत छिन्नविछिन्न करुन पोबारा केला. हा सर्व थरार सदर शेतक-याने बघितला आणि गावक-यांना सांगितला. गावक-यांनी घटनास्थळी भेट देऊन हळहळ व्यक्त केली. यानंतर ग्रामस्थांनी या मृत वानरांवर विधीवत अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची भीती मात्र वाढली आहे.