छत्रपती संभाजीनगर : अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर निर्माणाधीन असून, तिथे २२ जानेवारीला श्रीरामाच्या बालरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा देशातील आजपर्यंतचा सर्वांत मोठा धार्मिक सोहळा असेल. पुढील महिन्यात शहरवासीय ‘दिवाळी’ साजरी करण्यासाठी सज्ज झाले असून, हा सोहळा ‘कॅश’ करण्यासाठी व्यापारीही तयारीला लागले आहेत. २२ दिवसात बाजारपेठेत सुमारे ३०० कोटींची उलाढाल होईल, असा होरा व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.
अयोध्येतील मंदिराच्या प्रतिकृतीपासून ते पूजेच्या साहित्यापर्यंतअयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती आपल्या देवघरात पूजेसाठी भाविक खरेदी करणार आहेत. उत्तर प्रदेशात एमडीएफपासून तयार केलेल्या अयोध्या मंदिराचे थ्री डी मॉडले शहरात विक्रीसाठी आणण्याकरिता अनेक व्यापाऱ्यांनी ऑर्डर दिल्या आहेत. यात ४ इंच, ५.५ इंच, ८ इंच व १२ इंच असे ४ आकारांत श्रीरामाचे मंदिर आहे. याशिवाय जय श्रीरामाचे टी-शर्ट, शर्ट, कुर्ता, टोप्या, फेटे तसेच श्रीरामाचे व मंदिराचे छायाचित्र असलेले ध्वज, पताका, सजावटीचे साहित्य, केशरी फुगे, पणत्या, लाईटिंग, रांगोळी, गुलाल, पूजेचे साहित्य, याशिवाय शोभायात्रेसाठी बँडपथक, डीजे, साऊंड सिस्टिम, एलईडी, अश्वरथापर्यंत सर्वांना मागणी असणार आहे.
देशभरात ५० हजार कोटींची उलाढालदेशभरातील सर्व व्यापारी संघटनांची शिखर संघटना ‘कॅट’ (कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स)चे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, कॅटच्या वतीने देशभरात ‘हर शहर अयोध्या; घरघर अयोध्या’ अभियान सुरू होईल. १ ते २२ जानेवारीदरम्यान व्यापारी आपली दुकाने श्रीराममय करतील. व्यापारी संघटनांचे पदाधिकारी प्रत्येक दुकानात जाऊन पत्रिका, अक्षता वाटप करणार आहेत. २२ दिवसात संपूर्ण देशात बाजारपेठेत ५० हजार कोटींची उलाढाल होणार आहे.
व्यापारी संघटनांची बैठकअयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. व्यापारीही अभियान राबविणार असून, अशा धार्मिक सोहळ्याने देशात मोठी उलाढाल होणार आहे. शहरातही ३०० कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा बूश मिळणार आहे.- अजय शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट