लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : ‘भानुदास-एकनाथ’चा जयघोष करीत शेकडो किलोमीटर अंतर कापून आलेल्या वारकºयांच्या शेकडो दिंड्या मंगळवारी दुपारनंतर प्रतिष्ठाननगरीत दाखल होण्यास प्रारंभ झाला. दिंड्यांसह आलेल्या लाखो वारकºयांच्या उपस्थितीने पैठणनगरी दुमदुमली आहे. शहराला जणू पंढरीचे स्वरूप आले आहे.साडेचारशे वर्षांची परंपरा असलेल्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्यास तुकाराम बीजेपासून प्रारंभ झाला. पैठण शहरात दिंड्या मुक्कामी थांबण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने चांगल्या जागा यंदा उपलब्ध करून दिल्या आहेत.शिवाय गोदावरीचे वाळवंट यात्रा मैदान, दत्त मंदिर परिसर व शहरभर राहुट्या व फड उभारण्यात येत होते. नाथांचे दर्शन झालेल्या दिंड्या आपापल्या राहुट्यात व फडात विसावत असल्याचे चित्र आज शहरभर दिसून येत होते.मंगळवारी नाथवंशजांच्या वतीने षष्ठी सोहळ्यात सहभागी व्हावे म्हणून पांडुरंग भगवंतास अक्षत ( निमंत्रण) दिले गेले. याचप्रमाणे षष्ठीतील मानकरी नाथोपाध्ये संतकवी अमृतराय संस्थान भगवानगड ह.भ.प. अमळनेरकर महाराज यांनाही नाथवंशजांकडून निमंत्रण देण्यात आले.बुधवारी सकाळी ११ वाजता नाथ वंशजांची निर्याण दिंडी गावातील नाथ मंदिरातून निघणार आहे. या दिंडीत सर्व मानकरी सहभागी होतात. वाळवंटातून त्या बाहेरील नाथ मंदिरात जातात. या ठिकाणी अवघेचे त्रैलौक्य आनंदाचे आत या अभंगावर कीर्तन होते.वारकºयांना सेवा -सुविधा देण्यासाठी यात्रा परिसरात नगर परिषदेने कार्यालय हलविले आहे. या कार्यालयातून सर्व सुत्रे हलविण्यात येत आहेत . पोलीस स्टेशन सुध्दा यात्रा मैदानात स्थलांतरीत करण्यात आले आहे. शिवाय आरोग्य विभागाच्या वतीने यात्रा मैदानात दवाखाना सुरू केला आहे. पाण्याचे टँकरही यंदा मुबलक असल्याने सर्वांना वेळेवर पाणीपुरवठा करण्यात येईल, असे नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी सांगितले.मंदिरात भाविकांना दर्शन सुरळीत घेता यावे म्हणून संस्थानच्या वतीने संपूर्ण दर्शन रांगेस मंडप टाकण्यात आला आहे. शिवाय सर्व दर्शनरांग सीसीटीव्हीच्या नजरेखाली ठेवण्यात आली असल्याचे नाथ संस्थानचे अध्यक्ष आ. संदीपान भुमरे यांनी सांगितले. भुमरे यांनी नाथ मंदिरात दर्शन व्यवस्थेचा आढावा घेऊन वारकºयांना सुविधा देण्याबाबत संस्थान प्रशासनास विविध सूचना दिल्या.
नाथषष्ठीसाठी प्रतिष्ठाननगरीत अवतरली पंढरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 12:36 AM