औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी ज्योतीराम धोंगडे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्याच्यावर बलात्कारासह फसवणूक, जिवे मारण्याचा प्रयत्न, नियमबाह्य शस्त्र बाळगण्याचा गुन्हा मुकुंदवाडी ठाण्यात दाखल आहे. त्यामुळे त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
टँकर माफियांची लाॅबिंग चालविणारा शिंदे सेनेचा भूतपुर्व पदाधिकारी ज्योतीराम विठ्ठलराव धोंगडे (रा. मातोश्रीनगर, गारखेडा) याच्या विरोधात १० सप्टेंबर रोजी मुकुंदवाडी ठाण्यात पीडितेने गुन्हा नोंदविला होता. तेव्हापासून धोंगडे हा फरार आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज फेटाळल्यानंतर त्याने खंडपीठात धाव घेतली. त्याठिकाणी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती एन.बी. सूर्यवंशी यांनी त्याचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला. पीडितेतर्फे सरकरी वकील ॲड. एन.टी. भगत, ॲड. संदीप राजेभोसले यांनी काम पाहिले.
राजकीय वरदहस्तामुळे अभयधोंगडे याच्यावर बलात्कारासह दीड ते दोन कोटींची फसवणूक, जिवे मारण्याचा प्रयत्न, पिस्तूलचा धमकावण्यासाठी वापर केल्याचा आरोप आहे. त्याने पीडितेला लग्नाचे अमिष दाखवून शारिरीक संबंध निर्माण केले. तसेच त्याने पीडितेचे अश्लिल व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून धोंगडे फरार आहे. त्याच्या अटकेसाठी मुकुंदवाडी पोलिसांची एक पथक मुंबईच्या दौऱ्यावर जाऊन आले होते. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे त्यास अद्याप अटक झालेली नाही. खंडपीठाने धोंगडेचा अटकपूर्व जामिन फेटाळल्यामुळे त्यास अटक करावे लागणार आहे. दरम्यान, धोंगडे याने पीडितेच्या विरोधात पुंडलिकनगर ठाण्यात अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पोलिसांनी पीडितेला नोटीस बजावली आहे.