संकेतस्थळावर माहिती उपलब्ध
औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघातील औरंगाबाद जिल्ह्यातील पदवीधर मतदारांना त्यांचे मतदान केंद्र व केंद्र इमारतीचा तपशील कळावा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपले मतदान केंद्र व मतदान केंद्राचा पत्ता शोधा या शीर्षकाखाली ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.
ड्रेनेजवरील ढापे गेले वाहून
औरंगाबाद : पुंडलिकनगर परिसरातील नाल्यातून टाकण्यात आलेल्या ड्रेनेज वाहिनीवरील ढापे आणि ड्रेनेज मेनहोल गेल्या पावसाळ्यात वाहून गेले आहे. त्यावर नागरिकांनी ढापे आणून दगडाने चेंबर झाकून ठेवले आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे ते याकडे लक्ष देत नाहीत, तर मनपाकडे तक्रार करूनही दुरुस्तीसाठी कुणी येण्यास तयार नाही, अशी ओरड नागरिकांतून होत आहे.
जलवाहिनीची डागडुजी सुरू
औरंगाबाद : हडको एन-१२ परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी विवेकानंद उद्यानाच्या डाव्या बाजूला मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. त्याची माती रस्त्यावर टाकण्यात आल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक आणि सदरील ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी केली आहे.