साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : नाल्यात केरकचरा टाकून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे गतवर्षी पावसाच्या पाण्याने कॉलनी व परिसरात थैमान घातले होते. त्यामुळे सातारा-देवळाई परिसरात पावसाळापूर्व नालेसफाईचे काम मनपाने हाती घेतले आहे. जवळपास ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.
औरंगाबादचे दक्षिण शहर म्हणून झपाट्याने वाढत असलेल्या सातारा-देवळाई परिसरात टोलेजंग इमारती व सोसायटी, कॉलनी उभ्या राहिल्या आहेत. शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचारी या परिसरात वास्तव्यास असून, विविध बँका, सोसायटींकडून कर्ज घेऊन हक्काचे घर उभारले आहे. या परिसरात मूलभूत सेवासुविधा पुरविण्याकडे मनपाने दुर्लक्ष केलेले आहे. आज ना उद्या सर्व सुरळीत होईल या आशेवर नागरिकांकडून गुंतवणूक केली जात आहे. पाण्यासाठी नागरिकांना आजही टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. साफसफाईकडेही दुर्लक्ष आहे. मोजके रस्ते सोडले, तर अनेक रस्ते आजही खेड्यातील रस्त्यांची आठवण करून देतात. खेळण्यासाठी मुलांना बागबगीचा नाही, उद्यान, खेळाचे मैदान अतिक्रमित झालेले आहे. गतवर्षी सातारा परिसरात विविध कॉलनी, वसाहतींमध्ये पावसाच्या पाण्याने थैमान घातले होते. अनेकांच्या घरांमधील संसारोपयोगी साहित्य पाण्यात तरंगत होते. याला फक्त कारणीभूत होते, ते अतिक्रमित नाले. महानगरपालिकेने यंदाही नाले सफाई हाती घेतली असून, बायपासवरील नाला, देवळीकडे जाणारा प्रथमेश नगरीचा नाला, चाटे शाळेमागील नाला, ५२ घरांजवळील नाला, सातारा गाव येथील नाला, सुधाकरनगरकडे जाणारा नाला, या ७० टक्के नाल्यांचे खोलीकरण व सफाई मनपाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. आठवडाभरात खेड्याकडे जाणाऱ्या नाल्यांपासून सर्व सफाई पूर्ण होणार आहे. संथ गतीने सुरू असलेले काम मनपाच्या पथकाने आता जोमाने हाती घेतले आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. तत्पूर्वी ही कामे पूर्ण व्हावीत, अशी मागणी सातारा-देवळाई परिसरातून हकीम पटेल, नामदेव बाजड, महेश चौधरी, शेखर म्हस्के आदींनी केली आहे.
धडक कारवाई करणार...
नैसर्गिक जलस्रोत बुजविण्याचे प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. गतवर्षी नागरिकांना झालेला त्रास यावर्षी होऊ नये म्हणून खबरदारी घेतलेली आहे. ७० टक्के कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे मान्सूनपूर्व पूर्ण होतील.
-लक्ष्मीकांत कोतकर, कनिष्ठ अभियंता मनपा