औरंगाबाद : मराठवाड्यातील मान्सूनपूर्व कामांना कोरोनाच्या प्रसारामुळे ब्रेक लागला आहे. विभागातील सर्व यंत्रणा कोरोनाच्या नियंत्रणात गुंतलेली आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व कामांच्या नियोजनासाठी अद्याप प्रशासनाला वेळच भेटला नाही.
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात पर्जन्यमान चांगले होणार असल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे. विभागातील गोदावरी, पूर्णा, दुधना, सिंदफणा, मांजरा, तेरणा या सहा प्रमुख नद्या असून, त्या नदीपात्रांत पूरस्थिती निर्माण झाली तर त्याअनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसाठी मान्सूनपूर्व तयारी करावी लागते. परंतु कोरोनामुळे विभागातील इतर कामांकडे लक्ष देण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नसल्यामुळे सध्या सगळे काही ठप्प पडलेले दिसते आहे. गोदावरी नदीवर सहा ठिकाणी पूल आहेत. त्यात कायगाव, पैठण, शहागड, लोणी, ढालेगाव, गंगाखेड, नांदेड येथे ते पूल आहेत. संभाव्य पूरस्थितीचा विचार करून येथे नियोजन करण्यासाठी मान्सूनपूर्व बैठकीत निर्णय होत असतो. विभागात १ हजार ७७ पूरप्रवण गावांची संख्या आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १७०, जालना ४६, परभणी ८९, हिंगोली ७०, नांदेड ३३७, बीड ६३, लातूर १५८, उस्मानाबादमधील १४४ गावांचा समावेश आहे. पूरबचाव साहित्य विभागात किती प्रमाणात आहे, याबाबतचा आढावा मान्सूनपूर्व बैठकीत घेण्यात येतो.
मराठवाड्याची भौगोलिक स्थिती अशी-
२००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या - १ कोटी ८७ लाख २७ हजार ७२८, भौगोलिक क्षेत्रफळ - ६३.९३ लाख हेक्टर, रस्त्यांची लांबी - ६५ हजार ४८७, जिल्हे - ८, उपविभाग - ३८, तालुके - ७६, महसूल मंडले -४२१, तलाठी सजे - २४७६, महसुली गावे- ८५३६, महापालिका -४, नगर परिषदा- ५३, नगरपंचायती- २२, जिल्हा परिषद-८, पंचायत समित्या-७६. ग्रामपंचायती- ६,६५१