विनोद जाधव ।लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद) : येथून जवळच्या वसूसायगाव शिवारातील (गंगापूर तालुका) एका विहिरीतून गेल्या पाच वर्षांत तब्बल ७० ते ८० लाख रुपयांच्या गारगोटी दगडाची (रंगीबेरंगी) तस्करी झाल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. या गोरखधंद्यात सहभागी करून न घेतल्याने एका व्यापाऱ्याने या प्रकरणाचा बभ्रा केला.या विहिरीचे २०१३ मध्ये खोदकाम सुरू करण्यात आले होते. ३० फूट खोदल्यावर आकर्षक गारगोटी दगड सापडू लागले. त्यानंतर आणखी खोदकाम करीत सुमारे ८० लाख रुपयांच्या दगडांची तस्करी करण्यात आल्याची माहिती अजिंठा येथील पठाण नामक व्यापाºयाने दिली. गौण खनिज कायद्यानुसार परवानगी घेऊनच या दगडांची वाहतूक करता येते. मात्र कोणतीही परवानगी न घेता संबंधित शेतकºयाला एका दिवसाच्या खोदकामातून मिळालेल्या दगडाच्या मोबदल्यात दहा हजार रुपये देऊन हा व्यापार बिनदिक्कत सुरू होता. संबंधित तस्कर हे दगड देशी- विदेशी पर्यटकांना विकून लाखो रुपयांची कमाई करीत असत.दगडांचे मोल मोठेअगेट दगडांप्रमाणे ‘मॉस स्टोन’ हा हिरवट-काळपट रंगाचा असतो. घराच्या भिंती किंवा सजावटीसाठी या दगडाला खूप मागणी असते. येथील काही दगडांना परदेशात कोट्यवधी रुपयांचे मोल आहे.आमच्या कार्यालयाच्यावतीने यासंबंधी कोणालाही अशा उत्खननाची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे संबंधित तलाठ्याला पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.
विहिरीत सापडलेल्या मौल्यवान दगडाची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 1:56 AM