नियुक्त्या: नऊ तालुक्यांसाठी आता चार जिल्हा युवाधिकारी
औरंगाबाद : युवा सेनाप्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर केली. ५० जणांच्या या जम्बो कार्यकारिणीत तीन जिल्हा युवा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर आणि ग्रामीण मिळून आता चार जिल्हा युवा अधिकारी युवा सेनेचे काम करणार आहेत. दोन तालुक्यांसाठी एक असे तीन पदे ग्रामीण भागात तर एक पद शहरातील तीन मतदारसंघासाठी मागेच नियुक्त केले आहेत.
या कार्यकारिणीमध्ये प्रत्येकाची मर्जी सांभाळण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. एवढे पदाधिकारी केल्यामुळे कुणी कोणते काम करावे, यावरून संघटनेत कुजबुज सुरू आहे. शहर कार्यकारिणीमध्ये अनेकांना डावलण्यात आले होते, त्यांनाही ग्रामीण कार्यकारिणी स्थान मिळाले आहे. तसेच मतदारसंघनिहाय लोकप्रतिनिधींच्या मर्जीतीलच पदाधिकारी कार्यकारिणीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सहा उपजिल्हा युवा अधिकारी, सात जिल्हा समन्वयक, सहा जिल्हा चिटणीस, चार शहर समन्वयक, ९ शहर युवा अधिकारी तर ११ तालुका युवाधिकारी सोबतच शहर व तालुका जिल्हा उपसमन्वयक पदांवरही कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेवेदावे, गटातटाचे राजकारण वाढेल
स्वबळावर लढण्यासाठी शिवसेनेची तयारी सुरू आहे. अशातच युवा सेनेची कार्यकारिणी गठीत करताना सर्वांना ॲडजेस्ट करण्याचा प्रयत्न केला असला तरी यामुळे गटातटाचे आणि हेव्यादाव्यांचे राजकारण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एवढ्या पदांमुळे कुणाचेही कुणावर नियंत्रण नसेल, असेही बोलले जात आहे. शहर आणि ग्रामीण कार्यकारिणीचे पक्ष वाढीला किती बळ मिळेल हे येणाऱ्या काळात दिसेल.