औरंगाबाद : मुलगा-मुलगी समान मानले जात असले तरी अजूनही दत्तक घेताना मुलांचाच विचार केला जातो, अशी माहिती साकार संस्थेतून दत्तक गेलेल्या बाळाच्या आकडेवारीवरून समोर आली.
दत्तक जाणीव जागृती सप्ताहाचा सांगता सोहळा शनिवारी साकार संस्थेत निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. आजपर्यंत ० ते ६ वर्षापर्यंतची ५१२ अनाथ बाळं संस्थेत दाखल झाली. त्यात २५७ मुले, तर २५५ मुली होत्या. त्यातील ३६० बाळांना दत्तक देण्यात आले. त्यातही १८८ मुले व १७२ मुलींचा समावेश आहे. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलिमा पांडे यांनी सांगितले की, दत्तक घेणाऱ्या दाम्पत्यांमध्ये आजही मुलगा दत्तक घेण्याची मानसिकता आहे. विशेष बाळही संस्थेत येतात. ज्यांना जन्मजात व्यंग असते. अशा बाळांना विदेशातील दाम्पत्य दत्तक घेतात; पण आपल्या देशातील दाम्पत्य अशा अनाथ बाळांना दत्तक घेण्याचे धाडस करीत नाहीत.
अध्यक्षा डॉ. सविता पानट म्हणाल्या की, मुळात कोणावरही बाळ टाकून देण्याची वेळ येऊ नये. जन्म देणाऱ्या आई-वडिलांनी त्यांचा सांभाळ केला तर अनाथालयाची गरज पडणार नाही.
सोहळ्याच्या साक्षीदार ठरलेल्या बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. ज्योती पत्की म्हणाल्या की, आता बाळ दत्तक देण्याची संपूर्ण प्रकिया ऑनलाईन झाली आहे. मुलं दत्तक घेण्यासाठी आता समाजात जनजागृती झाली आहे. स्वतःहून दाम्पत्य योग्य वयात बाळ दत्तक घेण्याचा विचार करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बालकल्याण समितीच्या सदस्या ॲड. मेघना चपळगावकर, जिल्हा बालसंरक्षक अधिकारी महादेव डोंगरे, संस्थेचे सुहास वैद्य यांची यावेळी उपस्थिती होती. अश्विनी भुजाडे यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
कायदेशीरपणे दत्तक घेणे योग्य
बालकल्याण समितीचे सदस्य ॲड. मनोहर बन्सवाल यांनी सांगितले की, कोणत्याही दाम्पत्याने शासकीय यंत्रणेद्वारा कायदेशीरपणे बाळ दत्तक घेणेच योग्य होय. दत्तक जाणीव जागृतीचे कार्य वर्षभर चालले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.