छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरात चार ठिकाणी ११ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. ४० हजार लाभार्थ्यांनी मनपाकडे अर्ज केले आहेत. या लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने घर नेमके कुठे पाहिजे, हे नमूद करावे लागेल. त्यामध्ये तीन पसंतीक्रमही राहतील. या कामासाठी मनपा खासगी एजन्सी नियुक्त करीत आहे. ज्या ठिकाणी सर्वाधिक इच्छुक राहतील, तेथे ड्रॉ पद्धतीचा अवलंब केला जाईल.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पडेगाव, हर्सूल, सुंदरवाडी आणि तिसगाव या चार ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या चारही गृहप्रकल्पांमध्ये ११ हजार घरे बांधण्यात येणार आहेत. मनपाकडे अगोदरच ४० हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. या पात्र उमेदवारांना मनपाकडून एक एसएमएस पाठविला जाईल. त्यात लाभार्थ्यांना घर नेमके कुठे पाहिजे, हे ऑनलाइन पद्धतीने नमूद करावे लागेल. ज्या लाभार्थ्यांना ऑनलाइन पसंतीक्रम देता येत नसेल, तर त्यांच्यासाठी प्रत्येक झोन कार्यालयात एक कर्मचारी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिला जाईल. या प्रक्रियेसाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. निविदा प्रकाशित केली. एकाच एजन्सीने निविदा भरली. त्यामुळे फेरनिविदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आरक्षणाचे निकष पाळणारपंतप्रधान आवास योजनेत एकल महिला, विधवा, एससी प्रवर्ग, एसटी प्रवर्ग आणि इतर असे निकष ठरवून दिले आहेत. त्या निकषानुसार लाभार्थ्यांची निवड केली जाईल. ज्या ठिकाणी सर्वाधिक मागणी असेल, तेथे ड्रॉ पद्धतीचा अवलंब केला जाणार असल्याचे प्रकल्पप्रमुख अपर्णा थेटे यांनी सांगितले.