लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एसटी महामंडळात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गरोदरपणात बसमधील कर्तव्यामुळे महिला वाहकांना गर्भपाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासह गरोदर महिला वाहकांना टेबल वर्क मिळालेच पाहिजे. या मागण्यांकडे महामंडळाने दुर्लक्ष केले तर प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा निर्धार महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा शनिवारी (दि. २२) कै. भाऊ फाटक स्मृती कामगार भवनमध्ये विभागीय महिला मेळावा पार पडला. यावेळी संघटनेच्या विभागीय उपाध्यक्षा अरुणा चिद्री, मीनाक्षी राडीकर, रेखा सेवलीकर, साबेरा सिद्दीकी, नालंदा धीवर, अलका राजेभोसले, पूजा एम्पाल, प्रियंका जाधव, मनीषा पाटील आदींची उपस्थिती होती. या मेळाव्यानिमित्त एसटी महामंडळात कार्यरत औरंगाबाद विभागातील म्हणजे जिल्ह्यातील महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्याची संधी मिळाली. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या मांडल्या. यामध्ये गरोदरपणात कर्तव्य करताना होणाऱ्या त्रासाबद्दल प्राधान्याने मत व्यक्त केले.
गरोदर महिला वाहकांना टेबल वर्क मिळविणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 1:02 AM