लाडसावंगी : परिसरात शुक्रवारी सायंकाळी अंजनडोह, बोरवाडी, डोंनवाडा, नायगव्हान, लामकाना, हातमाळी, शेलुद, चारठा या गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यात गारपिटीने या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब, मका, कांदा व इतर फळबागांचे नुकसान झाले.
अंजनडोह येथील शेतकऱ्यांचे घरांचे पत्रे उडून गेली. भिंतीही ढासळल्या. काही शेतकऱ्यांच्या शेतातील शेड नेट उखडून पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, तर काही शेतकऱ्यांच्या गोठ्यांचे छप्पर उडून गेल्याने जनावरांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच अतिवृष्टीने खरिपातील पिके गेली. त्यात रब्बीमधील हरभरा, गहु, कांदा ही पिके हातात येण्याच्या वेळेलाच शुक्रवारी अवकाळीने तीही उद्ध्वस्त केली आहेत. या अवकाळी पावसाने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
फोटो : लाडसावंगी सर्कलमधील अंजनडोह येथे नेट शेड, घरावरील पत्रे, कांदा पिकाचे झालेले नुकसान.