औरंगाबाद : चिकलठाणा व रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील कारखाने सोमवारपासून पूर्ण ताकदीनिशी सुरू होतील. सध्या कामगारांना बस किंवा चारचाकीमधून येण्यासाठी ‘एमआयडीसी’मार्फत आॅनलाईन पास दिले जात असून आठवडाभरात दुचाकीवर ये-जा करण्यासाठीदेखील परवानगी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
महापालिका प्रशासनाने या दोन्ही औद्योगिक वसाहतींतील उद्योग सुरू करण्यास बुधवारी रात्री उशिरा अनुमती दर्शवली. त्यानंतर काल गुरुवारपासून उद्योजकांनी ‘एमआयडीसी’च्या पोर्टलवर उद्योग सुरू करण्याची परवानगी मागणारे आॅनलाईन अर्ज केले. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत लहान-मोठे ४०० ते ४२५ उद्योग असून रेल्वेस्टेशन परिसरात २५ ते ३० उद्योग आहेत. ‘एमआयडीसी’नेही तत्परता दाखवत कालपासूनच उद्योजकांना परवानगी व कामगारांना कारखान्यांमध्ये ये-जा करण्यासाठी पास वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली.
तथापि, महापालिका प्रशासनाने उद्योग सुरू करण्यास हिरवा कंदिल दाखविल्यानंतर काल गुरुवारपासून या दोन्ही औद्योगिक परिसरातील उद्योगांनी यंत्रांची साफसफाई, निर्जंतुकीकरण, फिजिकल डिस्टन्सिंंगची व्यवस्था, डिजिटल थर्मल स्क्रीनिंग आदी पूर्वतयारी सुरू केली आहे. या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये शुक्रवारी हा सुटीचा दिवस असतो. त्यामुळे शुक्रवारीही कारखाने व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या दोन्ही औद्योगिक परिसरातील कारखान्यांमध्ये एकूण ३० ते ३५ हजार कामगार आहेत. त्यानुसार परिसरामध्ये पहिल्या टप्प्यात साधारणपणे साडेचार ते पाच हजार कामगारांवर उद्योग सुरू केले जातील. दुसऱ्या टप्प्यात दुचाकीवर येण्याची परवानगी मिळाल्यानंतर पूर्ण ताकदीनिशी या परिसरातील सर्व उद्योग सुरू होतील, अशी उद्योजकांची अपेक्षा आहे.
पूरक उद्योग आणि पॅकेजिंगचिकलठाणा औद्योगिक वसाहतीत बजाज, व्हेरॉकसारख्या मोठ्या उद्योगांना सुटे भाग पुरविणारे पूरक उद्योग, पॅकेजिंग, इंजिनिअरिंग, औषधी कंपन्यांची संख्या अधिक आहे. गरवारे, वोक्हार्ट असे मोठे उद्योगही आहेत, तर रेल्वेस्टेशन परिसरात इंजिनिअरिंग, स्टेशनरी, वायरिंग उत्पादन करणारे उद्योग आहेत. मागील ५० दिवसांहून अधिक काळ हे उद्योग बंद होते. उशिरा का होईना, उद्योग सुरू करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे उद्योजक व कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.