औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशन परिसरातील मालधक्का कंटनेर कॉर्पोरेशन (कॉनकॉर) कंपनीच्या माध्यमातून चालविण्याच्या हालचाली सुरू आहेत. ‘दमरे’च्या नांदेड विभागाने यासंदर्भात तयार केलेला प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे. दौलताबादच्या धर्तीवर औरंगाबाद रेल्वेस्टेशनच्या परिसरातही लवकरच कंटेनर डेपो होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनच्या मालधक्क्यावर आजघडीला ११ मालडब्यांच्या क्षमतेचे शेड आहे. या ठिकाणी सिमेंट, गहू, तांदूळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा येथून युरिया, हरियाणा, पंजाब येथून ट्रॅक्टरची आवक होत असते. तसेच गेल्या काही महिन्यांत विविध ठिकाणी माल पाठविण्यातही वाढ होत आहे. यामुळे औरंगाबाद रेल्वेस्टेशन उत्पन्न वाढ होत आहे. मालवाहतुकीतून शहरातून रेल्वे विभागाला सुमारे ८.५० कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे.
या मालधक्क्याचा विकास केला जाणार आहे. माल वाहतूक वाढावी, शहरातील उद्योजकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने दौलताबाद कंटेनर डेपोवर सेवा देणा-या कॉनकॉर कंपनीला मालधक्क्यावरून मालाच्या वाहतुकीबाबत नियोजन करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. दौलताबाद कंटेनर डेपोतून यंदा आतापर्यंत ८० रॅक पाठविण्यात आलेले आहेत. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील मालधक्क्यावरील मालाची वाहतूक कॉनकॉर कंपनीने करावी, असा प्रस्ताव नांदेड विभागाने दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कंटेनर डेपोचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मालधक्क्यावरील वाहतूकमालधक्क्यावरून रिक्षाची वाहतूक होत आहे. यंदा १७ रेल्वेने रिक्षा पाठविण्यात आल्या. कांद्याचे ३ रॅक, १२ मक्क्याचे रॅक, विविध ठिकाणी पाठविण्यात आले आहेत. कांद्यासह मक्काही रेल्वे रॅकने बिहार, कोलकाता आदी ठिकाणी पाठविण्यात आली आहे.
मालधक्क्याचा विकास औरंगाबाद मालधक्क्यावरील कामकाज कॉनकॉर कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात यावे, असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मालधक्क्याचा विकास केला जाईल, मालधक्क्याबरोबर कंटेनर डेपोचाही विकास केला जाईल.- डॉ. ए. के. सिन्हा, व्यवस्थापक (डीआरएम), नांदेड विभाग