औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जास्तीचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा २५ टक्के जास्त पाऊस होईल, असा अंदाज गृहीत धरून मंगळवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी आपत्कालीन व्यवस्थापनासाठी विभागातील सर्व प्रशासकीय यंत्रणाप्रमुखांची बैठक घेतली. २५ मे नंतर मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांच्या पार्श्वभूमीवर यंदा चांगला पाऊस असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचे संकेत असल्यामुळे पूरजन्य परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली, तर जलसंपदा विभागाकडून पाणी सोडण्याची तयारी कशी असेल. याचा आढावा आयुक्तांनी घेतला. पुरात वाहून जाणाऱ्यांना वाचविण्यासाठी पोहणाऱ्या युवकांची टीम, पूरजन्यस्थितीत धरणातून पाणी कसे सोडणार, जायकवाडीवरील धरणातून किती पाणी येऊ शकते. पूरजन्यस्थितीत लोकनिवाऱ्याची व्यवस्था कुठे करणार, आरोग्य औषधी उपलब्धता, सर्पदंश झाल्यास लसींचा साठा असावा. यासाठी उपाययोजनांच्या सूचना केल्याचे डॉ. दांगट यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्याचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार आहे; परंतु विभागांतर्गत समन्वय वाढविण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचेही ते म्हणाले. बैठकीला नांदेड परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, औरंगाबाद परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, कर्नल बीज, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी.ए.बिराजदार, उपायुक्त जितेंद्र पापळकर, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, विद्युत, कृषी, आरोग्य, दूरसंचार, मनपा आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पावसापूर्वीच पुराची तयारी
By admin | Published: May 25, 2016 12:32 AM