औरंगाबाद : उच्चशिक्षण घेणाऱ्या १८ वर्षांपुढील विद्यार्थ्यांचे विद्यापीठ व महाविद्यालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण केल्यास येत्या शैक्षणिक सत्रात ऑफलाइन पद्धतीने अर्थात पूर्वीप्रमाणे वर्गातच अध्यापन करता येईल, या उद्देशाने उच्च शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. तथापि, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांत २ लाख ७३ हजार विद्यार्थ्यांना लस द्यावी लागणार असल्याचे सहसंचालक कार्यालयाने कळविले आहे.
कोरोनाचा उद्रेक वाढत चालल्यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्था ठप्प झाली आहे. अशात १८ वर्षांवरील नागरिकांना १ मेपासून लस देण्यास केंद्राने परवानगी दिली होती. त्यानंतर सर्वत्र लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आणि तूर्तास १८ वर्षांवरील तरुणांची लसीकरण मोहीम थांबविण्यात आली. दुसरीकडे, उच्च शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी आकडेवारीचा ताळमेळ सुरू केला आहे; पण प्रत्यक्षात लस मिळणार कधी, याबाबत विद्यार्थी व पालकांसमोर प्रश्न उपस्थित झाला आहे.
यासंदर्भात उच्च शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सध्या आपल्याकडे जरी १८ वर्षांपुढील तरुणांसाठी लसीकरण मोहीम थांबविण्यात आली असली, तरी लवकरच लसींचा मुबलक साठा उपलब्ध होईल, हे गृहीत धरून विद्यापीठ, तसेच महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा शासनाचा विचार आहे.
गेल्या महिन्यात उच्च शिक्षणमंत्र्यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत ऑनलाइन बैठक घेतली. त्यात यासंबंधी चर्चा झाली होती. त्याअनुषंगाने उच्च शिक्षण विभागाने राज्यातील अकृषी विद्यापीठ व त्यांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी संकलित केली जात आहे. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ४०० संलग्नित महाविद्यालयांमध्ये २ लाख ७३ हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे लागेल, अशी माहिती सहसंचालक कार्यालयाने उच्च शिक्षण विभागाला कळविली आहे.
चौकट...........
ऑफलाइन अध्यापनासाठी हालचाली
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने गेल्या वर्षापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. मात्र, ग्रामीण भागात साधनांची उपलब्धता फारसी नसल्यामुळे पाहिजे तसे ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकले नाही. जर विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये लसीकरण मोहीम राबविल्यास येत्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवून राज्य सरकारच्या परवानगीने ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देता येईल का, यासंबंधी वरिष्ठ पातळीवर विचार सुरू असल्याचे उच्च शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.