पैठण (औरंगाबाद): माजी मंत्री तथा युवसेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या बिडकीन दौऱ्यास शनिवारी मिळालेला पैठण तालुक्यातील शिवसैनिकांचा प्रतिसाद बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्या गोटात धडकी भरवणारा ठरला आहे. राजकीय पटलावरील अनिश्चिततेने बंडखोर व मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांचे समर्थक सध्या संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. त्यातच पैठण नगर परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. याद्वारे बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांना पैठणमध्येच धोबीपछाड मिळेल का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
आगामी नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकीला कसे सामोरे जावे लागेल, हक्काचे धनुष्यबाण चिन्ह मिळेल का ? गटासाठी वेगळे चिन्ह घ्यावे लागेल की भाजपा बरोबर जावे लागेल या विविध शक्यतेने भुमरे समर्थकांच्या मनात घालमेल सुरू आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. बिडकीनचे जिप सदस्य विजय चव्हाण, आपेगावचे जिप सदस्य ज्ञानेश्वर कापसे यांच्यासह कॉंग्रेसचे शहराध्यक्ष हसनोद्दीन कटयारे आदीनी दत्ता गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस सुसाट सुटल्याचे अधोरेखित करीत आहे. मागच्या पंचवार्षिक नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाचे सुरज लोळगे यांनी शिवसेनेला धोबीपछाड देत शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा जवळपास दुप्पट मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र, यावेळी शिंदे गटाचे आणि भाजपचे सत्तेच्या माध्यमातून वर्चस्व विरुद्ध ठाकरे यांना मिळणारी सहानभूती, राष्ट्रवादी व कॉंग्रेसची रणनीती अशी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग ? पैठण तालुक्यात आमदार संदीपान भुमरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दत्ता गोर्डे यांचे तगडे आव्हान आहे. आता आमदार भुमरे व शिवसेना वेगवेगळी झाल्याने भुमरे यांना शह देण्यासाठी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे, आप्पासाहेब निर्मळ कॉंग्रेसचे माजी मंत्री अनिल पटेल, विनोद तांबे, शिवसेनेचे प्रकाश वानोळे, राजू परदेशी यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी सहमती झाली तर महाविकास आघाडीचा प्रयोग अंमलात येऊ शकतो. मविआचा प्रयोग निश्चितच भुमरे यांची डोकेदुखी वाढविणारा ठरू शकतो.