निवडणुकांसाठी तयारीला लागा, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 07:54 PM2023-06-17T19:54:22+5:302023-06-17T20:18:58+5:30
दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराला हजेरी लावली. यावेळी, निवडणुकांच्या तयारीला लागा, असे सुतोवाच अजित पवार यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर - आगामी दीड वर्षात राज्यात महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदारसंघात राजकीय कार्यक्रमांची रेलचेल सुरू असून बडे नेतेही कार्यक्रमाच्या निमित्ताने निवडणुकांची भाषा बोलू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे "जागर संविधानाचा, लढा न्याय हक्काचा" हा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागानं आयोजित केलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराला हजेरी लावली. यावेळी, निवडणुकांच्या तयारीला लागा, असे सुतोवाच अजित पवार यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, आपलं राज्य, देश सध्याच्या घडीला संक्रमणाच्या काळातून जात आहे. अशा कठीण परिस्थितीत या शिबिराच्या माध्यमातून ज्येष्ठ विचारवंतांचं, अभ्यासकांचं मार्गदर्शन मिळणार असल्यानं विचारांचं मंथन चांगल्या प्रकारे होईल अशी खात्री आहे. देशाचं स्वातंत्र्य असो किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची जडणघडण असो महाराष्ट्रानं प्रत्येक क्षेत्रात देशाचं नेतृत्व केल्याचा इतिहास आपल्या सर्वांच्या समोर आहे. लोकहिताच्या अनेक योजना जशा की 'रोजगार हमी योजना' आणि 'स्वच्छता अभियान' ह्या महाराष्ट्रात आधी राबवल्या गेल्या; मग त्या देश पातळीवर सुद्धा राबवण्यात आल्या. अशा अनेक कार्यक्रमांना दिशा देण्याचं काम तुमच्या-माझ्या महाराष्ट्रानं केलेलं आहे.
आपला महाराष्ट्र अनेक सामाजिक सुधारणा घडवणारं, क्रांतिकारी निर्णय घेणारा राज्य आहे. महाराष्ट्रानं आपल्या देशाला नेहमीच पुरोगामी प्रगत विचार दिले. आपल्या देशावर चालून आलेली संकटं मग ती नैसर्गिक असो, आर्थिक असो, देशांतर्गत असो किंवा परकीय राष्ट्राचा हल्ला असो. प्रत्येक वेळेस महाराष्ट्र देशाच्या मदतीला धावून गेल्याचा इतिहास आहे. जुने जाणकार सांगतात, ज्यावेळेस मागील काळात युद्ध सुरु होते तेव्हा हिमालयाच्या मदतीला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या रूपानं सह्याद्री धावून गेला होता. आताच्या कठीण काळात आपण सर्वांनी ठाम उभं राहायचं आहे. शरद पवार यांनी २४ वर्षांपूर्वी स्वाभिमानातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.
एक-दीड वर्षात निवडणुका
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे या महान विभूतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन पवार साहेब इतकी वर्ष वाटचाल करीत आहेत. एक-दीड वर्षात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष आम्ही सगळे त्या दृष्टिकोनातून आमच्या जबाबदाऱ्या पार पाडूच. परंतु, सामाजिक न्याय सेलच्या निमित्तानं काम करत असताना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर बूथनुसार कामाची जबाबदारी कटाक्षानं उचलली पाहिजे, तुमच्यावर अधिकची जबाबदारी आहे, असा सल्लाच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच, राज्याच्या, देशाच्या हिताचा विचार आणि त्यासाठी उपयुक्त असणारी कृती ही पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून झाली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.