छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवर चालत्या बुलेटवर उभे राहून स्टंटबाजी करणाऱ्या सचिन बाबासाहेब लिपणे (२४, रा. प्रकाशनगर) याच्यावर दंडात्मक कारवाई करून पोलिसांनी सोडून दिले. त्यामुळे आता दंड भरा आणि खुशाल स्टंट करा, असा संदेशच वाहतूक पोलिस देत आहेत का, असा प्रश्न या कारवाईमुळे उपस्थित झाला आहे.
आठ दिवसांपूर्वी सचिनने विना क्रमांकाच्या बुलेटवर जालना रोडवरून उभे राहून स्टंट केला. तो एमबीएचा विद्यार्थी आहे. बुधवारी वाहतूक पोलिसांनी सचिनचा शोध लावत त्याला वाहतूक कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर मोटार वाहन अधिनियम अंतर्गत नोटीस बजावून न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावून सोडून देण्यात आले.
रस्त्यावरच 'मौत का कुआँ'मोंढा नाका उड्डाणपूलावरून आकाशवाणीकडे येत असताना जालना रोडवर 'मौत का कुआँ'प्रमाणे स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ऐन वाहनांच्या गर्दीत बुलेट चालविणारा तरुण बुलेटवर उभा राहतो. नंतर दोन्ही हात बाजूंना घेत स्टायलिश ओझही देतो.
गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का ?यापूर्वी प्रेयसीसोबत दुचाकीवर स्टंट करणाऱ्या तरुणावर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वत: किंवा इतरांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणल्याप्रकरणी बीएनएस १२५ (अ) व मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्ह्याची तरतूद आहे. मात्र, वाहतूक पोलिसांनी केवळ दंडात्मक नोटीस देऊन त्याला सोडून दिले. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.