औरंगाबाद - मनपा हद्दीतील २५३ शाळांत नववी व दहावीचे वर्ग ४ जानेवारीपासून सुरू करण्यासंदर्भात मनपा प्रशासक निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ३ जानेवारीपूर्वी संबंधित शाळांच्या शिक्षकांनी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तपासणी करुन घेण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनांना माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरला सुरू करण्यात आले. मात्र, शहरातील वर्ग त्यावेळी सुरू करण्यास स्थानिक प्रशासनाने म्हणजे मनपाने ३ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष वर्गात येणास परवानगी दिली नाही. त्यावेळी ४ जानेवारीला कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णयाचे मनपा पुनर्विलोकन करेल असे आस्तिककुमार पाण्डेय सांगितले होते. त्यानुसार, शिक्षणाधिकारी डाॅ. चव्हाण यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात मनपा प्रशासक पाण्डेय यांच्याशी चर्चा केली. त्यावर त्यांनी ३ जानेवारीपूर्वी शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करुन घेण्याचे नियोजन करण्याची सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना केली.
डाॅ. चव्हाण यांनी गुरुवारी शहरातील नववी व दहावीचे वर्ग असलेल्या सर्व शाळांच्या शिक्षकांनी तपासणी करून घेण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनांना दिले आहे. २४ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान शक्यतो शासकीय तपासणी केंद्रातून आरटीपीसीआर तपासणी करुन घेण्याचे आदेशात म्हटले असून ११ वी व १२ वीच्या राहिलेल्या शिक्षकांनीही ३ जानेवारीपूर्वी तपासणी करून घ्यावी. शासन आदेश व शाळा सुरू करण्याची स्थानिक प्रशासनाच्या जबाबदारीसह सर्व आवश्यक तयारी व त्यासंबंंधित कार्यवाहीची माहिती देण्याचेही त्यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. १५ डिसेंबरला अचानक अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय मनपाने घेतला. मात्र, तपासणीचे नियोजन नसल्याने हे वर्ग सुरू होण्याला उशीर झाला. आठवडाभरानंतर बहुतांश वर्ग सुरू झाले. त्यामुळे शिक्षण विभागाकडून तपासणीच्या नियोजनाची खबरदारी घेण्यात आली.