पाटोदा: तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत सुरू असलेल्या कामावर कागदोपत्री मजूर उपस्थित असल्याचे दाखविले जाते. कामे मात्र यंत्रानेच होत असल्याचे दिसून येत आहे. रोहयोच्या कामात सुरू असलेले हे प्रकार थांबविण्याची मागणी आहे.सामान्य नागरिकांना काम मिळावे यासाठी सरकारने कायदाही तयार केलेला आहे. यामुळे मजुरांनी ग्रामपंचायतकडे कामाची मागणी करताच त्यांना काम देणे बंधनकारक आहे. बहुतांश मजुरांना काम मिळावे यासाठी मग्रारोहयो सारख्या योजनेतून विविध कामे उपलब्ध करून दिली जातात. या योजनेत गैरप्रकार होऊ नये यामुळे मजुरांना मजुरीचे पैसे त्यांच्या बँक किंवा पोस्टाच्या खात्यावर दिले जातात. या योजनेमध्ये गैरप्रकार होऊ नयेत यासाठी शासनाने नियम तयार केले असले तरीही या योजनेत शिरलेले काही दलाल व योजनेतील अधिकारी, कर्मचारी नाना शक्कल लढवित असल्याचे दिसून येत आहे.सध्या तालुक्यातील महासांगवी येथे एकाही रस्त्याचे काम झालेले नाही. असे असताना येथे रोहयो अंतर्गत काम सुरू असल्याचे दाखवून हजेरी पत्रकही भरले असल्याचे दस्तुरखुद्द येथील सरपंच भारती सद्गुरू गर्जे यांनी सांगितले. या संदर्भात दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी पाटोदा पंचायत समितीकडे केल्याचे त्या म्हणाल्या. गांभिर्याची बाब म्हणजे त्यांनी दोन वेळेस तक्रार करुनही कुठलीच कारवाई झाली नसल्याचे त्या म्हणाल्या. येथील रस्त्याचे काम दाखवून ७ ते ८ लाख रुपये उचलण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. तालुक्यात इतरही अनेक ठिकाणी मग्रारोहयोची कामे सुरू आहेत. येथे हजेरी पत्रकावर मजूर दाखविण्यात येतात. प्रत्यक्षात कामे यंत्रावरच होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांतून होत आहे. या साठी ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक, सरपंच ते थेट पंचायत समिती पर्यंतच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची साखळी असल्याचा आरोपही होत आहे.रोहयोच्या कामासाठी ग्रामरोजगार सेवक नेमले आहेत. ते थेट पंचायत समितीतील संग्राम कक्षाकडे अहवाल देत असतात. त्यामुळे महासांगवीतील कामाबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे तेथील ग्रामसेवक दत्तात्रय नागरे म्हणाले. (वार्ताहर)
कागदोपत्री मजुरांची उपस्थिती; पण यंत्रानेच होत आहेत रोहयोची कामे
By admin | Published: July 01, 2014 11:13 PM