औरंगाबाद : वाळूजमार्गे महावीर चौक ते चिकलठाणापर्यंत उड्डाणपूल उभारण्याबाबत डीपीआरचे काम (सविस्तर प्रकल्प अहवाल) पुढील महिन्यात सुरू होणार असून, डीपीआरनंतर पुलाच्या कामाचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
डीपीआरचे काम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी (एनएचएआय) राजीव अग्रवाल यांना पत्र देण्यास सांगितले आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी चिकलठाणा ते वाळूजपर्यंत उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावाचा विचार केला आहे. त्यानुसार डीपीआरचे काम हाती घेण्यात येईल.
दोन दिवसांपूर्वी अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी शहरातील रस्ते, एनएचएआयचे प्रकल्प व नवीन प्रस्ताव याबाबत बैठक घेतली होती. त्यानंतर मंगळवारी डॉ. कराड यांनी डीपीआरच्या अनुषंगाने दिल्लीत चर्चा केली.
दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीमध्ये आ. अतुल सावे, एनएचएआय प्रादेशिक अधिकारी अग्रवाल, कार्यकारी व्यवस्थापक नरेश वडेट्टवार, येथील प्रकल्प संचालक अरविंद काळे, माजी महापौर बापू घडामोडे यांच्यासह उद्योजक मुकुंद भोगले, मानसिंग पवार, विवेक देशपांडे उपस्थित होते.
शेंद्रा आणि वाळूज या दोन्ही औद्योगिक वसाहतींत वर्दळ असते त्यामुळे रस्त्याची कनेक्टिव्हिटी वाढविण्याचा विचार पुन्हा पुढे आला आहे. नगरनाका ते दौलताबाद टी पॉइंट आणि पुढे दौलताबाद गाव आणि वेरूळपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्याचेदेखील राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाने मान्य केले आहे.
ए.एस. क्लब ते लासुर, वैजापूर आणि शिर्डी असा नव्याने चार पदरी रस्ता विस्तारित करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी साईबाबा संस्थाननेही मदत करण्याचे कळविले आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर औट्रम घाट यामध्ये बोगदा करण्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
२५ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार बैठक
२५ तारखेला नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय राजमार्गचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील जास्तीत जास्त प्रकल्पांना मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी सांगितले. औरंगाबादमधील मंजूर आणि प्रस्तावित कामांबाबत तसेच औट्रम घाटातील बोगदा किंवा चौपदरी काम करण्याबाबत विचार होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.