औरंगाबाद : ‘म्हटले तर माझे सर्वच राजकीय पक्षांशी संबंध आहेत. म्हटले तर कोणत्याच राजकीय पक्षांशी नाहीत. पुढे काय होईल सांगता येणार नाही. पण सध्या तरी मी मराठवाड्याचा प्रशासकीय नेता आहे. हल्ली चांगले प्रशासकीय नेते कमी आहेत आणि म्हणून मी आपल्या पदाचा अधिकाधिक उपयोग लोकांची कामे करण्यासाठी करीत असतो’ असे मत विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केले.
ते हास्यदिनानिमित्त डी. एस. काटे व हास्यकवी डॉ. विष्णू सुरासे यांनी घेतलेल्या मुलाखतीत विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देत होते. मसापमध्ये झालेल्या या मुलाखतीच्या वेळी रसिकांची चांगलीच गर्दी झाली होती.ते म्हणाले की, महापालिकेत ११५ नगरसेवक असतात. पण आयुक्त एकच असतो. आज मी विभागीय आयुक्त आहे. पण मराठवाड्यात खासदार-आमदार अनेक आहेत. मला कुणी गॉड फादर नाही. मनाला, बुद्धीला जे पटते ती माझी विचारधारा राहिली. मला जो अधिकार मिळाला, त्याचा वापर जनतेसाठी करीत आलो. प्रशासनात उत्तम नेतृत्व देण्याचं काम मी केलंय. कारण प्रशासकीय नेतृत्वही फार महत्त्वाचं आहे.
डॉ.भापकर यांची मुलगी नुकतीच आयएएस झाली. त्या अनुषंगाने श्रोत्यांमधूनच प्रश्न विचारला गेला. त्यावर भापकर म्हणाले, मी सतत माझ्या मुलांना फ्री हँड देत गेलो. तुमच्या आवडीचं जे जे तुम्हाला करावं वाटतं, ते करा, पण त्यासाठी कठोर परिश्रम घ्या, अशी माझी भूमिका राहत आली. डिसेंबरमध्ये यात्रेत आलेले अनेक तमाशे मी पाहिले. तमाशांमध्ये प्रगल्भता असते. वाईट काहीही नसते. जयश्री काळे- नगरकर या तमाशा कलावंताचा मुलगा नुकताच आयएएस झाला. यापेक्षा मोठा आनंद तो काय असू शकतो. अमृत हास्य क्लबने शेवटी हास्याचे प्रयोग करून दाखवल्यानंतर कार्यक्रम संपला.
प्रेयसी भेटली होती का?महाविद्यालयीन जीवनात कुणी एखादी प्रेयसी भेटली होती का? या थेट प्रश्नावर डॉ. भापकर उत्तरले, प्रेयसी रोजच भेटत असते. पण ती बºयाच जणांना शोधता येत नाही. मी तर रोजच शोधण्याचा प्रयत्न करतो. राधेसारखं प्रेम प्रत्येकात असतं आणि प्रेमाच्या जोरावर कुणी कुठंही जाऊ शकतं. कोणत्या प्रेमाची ताकद तुम्ही निर्माण करू शकता हा प्रश्न आहे. प्रेम आईचं, बायकोचं, मैत्रिणीचं, मुला- मुलींचं कुणाचंही असू शकतं. (टाळ्या)