बीड : ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण बडे यांनी चऱ्हाटा (ता. बीड) ग्रामपंचायतीत केलेल्या गैरव्यवहारामुळे त्यांचे जिल्हाध्यक्षपद धोक्यात आले आहे. त्यांच्याविरूद्ध ग्रामसेवकांमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे.लेखणीबंद आंदोलनादरम्यान कोणतीही कार्यालयीन कामे करायची नाहीत, असा ठराव ग्रामसेवकांच्या बैठकीत झाला होता. मात्र, जिल्हाध्यक्ष नारायण बडे यांनी लेखणीबंदच्या काळात चऱ्हाटा ग्रामपंचायतीत मग्रारोहयोच्या काळात ६१ मजूर दाखवून मस्टर भरले. धक्कादायक म्हणजे हे मजूर देखील बोगस असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली. त्यानंतर माहिती आयोगाने बडे यांना नोटीस धाडली. लेखणीबंद आंदोलनाची मर्यादा भंग केल्यामुळे अडचणीत आलेल्या ढवळेविरूद्ध आता ग्रामसेवकांमधूनच उठाव होण्यास सुरूवात झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ग्रामसेवकाच्या एका गटाने सोमवारी गोपनीय बैठक घेऊन बडे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटविता येते का ? याची चाचपणी केली. या बैठकीला मोजके ग्रामसेवक उपस्थित होते. याबाबत बडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. (प्रतिनिधी)
ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षांविरुद्ध नाराजीचा सूर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2016 11:07 PM