लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील विठाई नर्सिंग महाविद्यालयात प्राचार्याने आमची छेड काढली, असे शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत आत्मविश्वासाने सांगणाऱ्या १२ विद्यार्थिनींपैकी सहा मुलींनी शनिवारी काढता पाय घेतल्याचे दिसले. केवळ सहाच मुली पोलीस अधीक्षकांकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी आल्या होत्या. फिर्यादी मुलीसह इतर पाच विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांवर दबाव आणल्याचा आरोप या सहा मुलींनी केला आहे. मुलींनी अचानक माघार घेतल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड दबाव असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.बीडपासून जवळच असलेल्या विठाई नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची चक्क येथील प्राचार्य राणा डोईफोडे हेच छेड काढत असल्याची तक्रार विद्यार्थिंनींनी शुक्रवारी सायंकाळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून या प्राचार्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. दरम्यान, प्राचार्य डोईफोडे हे ब्लॅकमेल करून आमची छेड काढत होते. तसेच त्यांचे ऐकले नाही तर प्रात्यक्षिकांचे गुण देणार नाही, असे धमकावत असल्याचा आरोप तक्रारदार मुलींनी केला होता. विशेष म्हणजे गंभीर गुन्हा असतानाही प्राचार्य डोईफोडे यांच्याविरोधात गंभीर कलमांचा वापर न केल्याने पोलिसांबद्दलही संशय बळावला आहे. सपोनि जगताप यांनी भ्रमणध्वनी न घेतल्याने बाजू समजली नाही.दरम्यान, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व शिवसेनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. बालाघाटवर डोईफोडे यांच्या पुतळ्याचे शिवसेनेच्या वतीने दहन करण्यात आले. त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.जामिनासाठी फिल्डींगप्राचार्य डोईफोडे यास जामीन मिळू नये, यासाठी विद्यार्थिनी व त्यांचे नातेवाईक स्थानक गुन्हे शाखेत बसले होते. डोईफोडे याचा जामीन मिळविण्यासाठी त्यांचे नातेवाईक व भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘फिल्डींग’ लावल्याचे दिसून आले. अधीक्षक कार्यालयात यामुळे सर्वत्र गर्दी झाली होती.
तक्रारदार विद्यार्थिनींवर दबाव
By admin | Published: May 27, 2017 11:00 PM