औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत औरंगाबाद तालुक्यातील आ. हरिभाऊ बागडे व सुरेश पठाडे यांच्यातील निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. चिन्ह वाटपात बुधवारी बागडे यांना कपबशी तर पठाडे यांना पतंग चिन्ह मिळाले.
मंगळवारी बागडे यांची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी करण्यात आलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. बुधवारी रिंगणात राहिलेल्या अन्य उमेदवारांनाही चिन्ह वाटप करण्यात आले. २२ जानेवारी रोजी मतदान होऊन २३ला निकाल लागेल. संचालकांच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक औपचारिकता असल्याचे मानले जात आहे. फुलंब्री मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांचे समर्थक असणारे संदीप बोरसे हे भाजपचे आ. हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलकडून निवडणूक लढवीत आहेत. सातही जागांसाठी एकतर्फी निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी सात जणांची बिनविरोध निवड झाली होती. संघाचे विद्यमान अध्यक्ष, आ. हरिभाऊ बागडे यांच्याविरुद्ध औरंगाबाद तालुका मतदारसंघात सुरेश पठाडे यांचा अर्ज कायम राहिला. फुलंब्री मतदारसंघात संदीप बोरसे यांच्याविरुद्ध विद्यमान संचालक राजेश पाथ्रीकर यांचा अर्ज कायम आहे. पाथ्रीकर हे बोरसे यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे.
भटक्या विमुक्त जाती - जमाती मतदारसंघात आ. बागडे यांच्या पॅनलचे पुंडलिक काजे आणि मारुती ताठे यांच्यात लढत होईल. कन्नड तालुक्यात गोकुळसिंग राजपूत, सुरेश चव्हाण, संतोष पवार यांच्यात तिरंगी लढत होणार असली तरी राजपूत यांचे पारडे जड आहे. वैजापूर तालुक्यात कचरू डिके यांचा सामना नंदकुमार जाधव यांच्याशी होईल.
महिलांच्या दोन जागांसाठी चुरशीची लढतमहिला राखीव मतदारसंघातील दोन जागांसाठी आ. बागडे यांच्या पॅनलच्या अलका रमेश डोणगावकर आणि शीलाबाई कोळगे यांची लढत शारदा गीते आणि रुख्मणबाई सोनवणे यांच्यात होणार आहे.