औरंगाबाद : पोलीस पुत्र आणि त्यांच्या पत्नीला बऱ्हाणपूरला जाणाऱ्या बसमध्ये बसवून एका भामट्याने तिकिटाच्या नावाखाली २ हजार १०० रुपये हिसकावून पळ काढला. हा प्रकार लक्षात येताच पोलीस पुत्राने पाठलाग करून आरोपीला पकडले. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.१५ वाजता घडली.
आमेर खान सलीम खान (२७, रा. पडेगाव), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हंसराज मोहन नंदवंशी (रा. लालमंडी, बेगमपुरा) हे आणि त्यांची आई बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथे जाण्यासाठी रविवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानकात आले होते. बऱ्हाणपूरला जाणाऱ्या फलाटावर ते उभे असताना आरोपी अचानक तेथे आला. बऱ्हाणपूरला जाणाऱ्या बसचा तो वाहक असल्याची बतावणी करून त्याने नंदवंशी आणि त्यांच्या आईला बसमध्ये नेऊन बसवले.
यावेळी तिकिटाचे पैसे त्याने मागितले. यामुळे नंदवंशी याने खिशातून पैशाचे पाकीट बाहेर काढले. यानंतर त्याने नंदवंशी यांच्या हातातील २ हजार १०० रुपये हिसकावून घेतले आणि तो बसमधून उतरून तेथून पळून जाऊ लागला. हा प्रकार लक्षात येताच हंसराजने आरडाओरड करीत त्याचा पाठलाग सुरू केला. त्याच्या मागे अन्य नागरिक आणि पोलीस धावले. काही अंतरावर आरोपीला पकडण्यात आले. या घटनेनंतर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात त्याला नेण्यात आले. हंसराज याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमेरविरुद्ध ठगबाजी आणि जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक जी. डी. दराडे यांनी दिली. हवालदार चांदेलकर हे तपास करीत आहेत. लुटलेले २ हजार १०० रुपये आणि एक मोबाईल आरोपीकडून जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.