औरंगाबाद : आगामी निवडणुकीत भाजपचा रथ रोखण्यासाठी बसपा समविचारी पक्षांसोबत जाणार असून, त्याप्रमाणे देशभर वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. मराठवाडा विभागाच्या बैठकीनिमित्त आलेले राष्ट्रीय उपाध्यक्ष जयप्रकाशसिंग यांनी मंगळवारी सुभेदारी येथे पत्रकारांना माहिती दिली.
बसपाने पक्षाच्या घटनेत राष्ट्रीय स्तरावर बदल केल्यानंतर सोशल इंजिनिअरिंग, झोननुसार तसेच गावपातळीवर देखील जनजागृती सुरू केली आहे. भाजपने ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करून देशातील लोकशाहीला खो देत हुकूमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मशीनमधील गोंधळास रोखण्यासाठी बसपा प्रयत्नशील असून, न्यायालयात हा वाद नेला आहे. मशीन आॅपरेट न करता मशीनमधील गोंधळ स्पष्ट करावा, असा भाजपचा कांगावा आहे. तज्ज्ञ विदेशातून बोलवून मशीनमधील गडबड समोर आणण्याची विनंती बसपाने कोर्टास केली आहे, असेही जयप्रकाशसिंग म्हणाले. २०१९ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने बसपाने तयारी सुरू केली असून, समविचारी पक्ष आमच्यासोबत येत आहे. कर्नाटक निवडणुकीत बसपाचा एक उमेदवार निवडून आला.
मागासवर्गीय नेत्यांनी बसपा सोबत यावे
महाराष्ट्रातील मागासवर्गीय नेत्यांनी बसपाच्या हत्तीची सवारी करावी, आम्ही त्यांच्यासोबत नव्हे तर त्यांनीच आमच्या सोबत यावे, असे राष्ट्रीय कोआॅर्डिनेटर खा. वीरसिंग यांनी सांगितले. सपा, काँग्रेस, तसेच समविचारी पक्षाला सोबत घेऊन भाजपची नाकाबंदी करण्यावर पक्षाचा जोर आहे. जनताही चार वर्षांतच भाजपच्या नाकर्तेपणाला कंटाळली असून, ईव्हीएम मशीन जनताच मतदान केंद्रातून बाहेर फेकतील अशी अवस्था निर्माण झाली आहे, असे राज्याचे प्रभारी डॉ. खा. अशोक सिद्धार्थ म्हणाले.
यावेळी पत्रकार परिषदेला महाराष्ट्राचे प्रभारी प्रमोद रैना, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, महाराष्ट्र प्रभारी ना. तु. खंदारे, कोषाध्यक्ष नदीमभाई चौधरी, जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवणे, किशोर म्हस्के आदींची उपस्थिती होती.