औरंगाबाद - बनावट जात प्रमाणपत्र सादर करून प्राचार्यपदाचे फायदे घेऊन शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी मौलाना आझाद कॉलेजच्या प्राचार्याविरूद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. डॉ. मकदुम मोईयोद्दीन फारुकी असे गुन्हा दाखल झालेल्या प्राचार्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, डॉ. शेख सलीम शेख चाँद (रा.मौलाना आझाद हौसिंग सोसायटी) यांनी याविषयी सिटीचौक पोलीस ठाण्यात २६ सप्टेंबर रोजी तक्रार नोंदविली. या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, डॉ. मकदुम फारुकी हे १९९३पासून मौलाना आझाद कॉलेजमध्ये प्राचार्य पदावर कार्यरत आहे. डॉ.फारुकी हे खुल्या प्रवर्गातील असूनही त्यांनी बेलदार(डीएनटी)जातीचे प्रमाणपत्र सादर करुन प्राचार्य पद मिळविले. तेव्हापासून तक्रारदार दाखल हाईपर्यंत आरोपीं डॉ. फारुकी यांनी बनावट दस्त तयार करणे,रबरी शिक्के व मोहर बनवून त्याचा उपयोग केला. एवढेच नव्हे तर प्राचार्य पदाच्या सर्व सवलती आणि वेतन घेऊन फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर हा गुन्हा गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
प्राचार्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 5:43 PM